नंदुरबार- राज्यभर शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी विद्यालयात उपस्थित राहून शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर थेट बोट ठेवले. विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या नखांपासून ते वसतिगृहातील अस्वच्छता, आणि सुविधांच्या अभावापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी अधिकाऱ्यांसह शिक्षकांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यामुळे शाळा प्रवेशाच्या दिवशीच भुसे मास्तरांनी शिक्षकांची शाळा घेतल्याची चर्चा रंगली.
शिक्षण मंत्री भुसे यांच्या उपस्थितीत तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी शाळेत शाळा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी भुसे यांच्यातील कठोर मास्तर जागा झाला. “मी तोरणमाळला थंड हवेचे ठिकाण पाहण्यासाठी आलेलो नाही. तर या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलो आहे,” असे सांगत भुसे यांनी शाळेतील व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थ्यांची वाढलेली नखे, विस्कटलेले केस आणि विद्यार्थिनींच्या पायात चप्पल नसल्याचे पाहून त्यांनी जाहीर खंत व्यक्त केली.
शाळा पाहणीदरम्यान भोजन कक्षातील अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था आणि वसतिगृह परिसरातील गैरव्यवस्थेवरून त्यांनी शिक्षण विभाग, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना धारेवर धरले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातच कर्मचाऱ्यांची वाहने उभी केलेली दिसताच भुसे संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना श्रीमंतांच्या मुलांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, हीच सरकारची भूमिका असल्याचे भुसे यांनी नमूद केले. डोंगरदऱ्यातील आदिवासी बांधवांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून या शाळेची निर्मिती करण्यात आली आहे.
तोरणमाळ खोऱ्यातील २० शाळा एकत्र करुन ही निवासी शाळा उभारली असली तरी या २० गावामध्ये जर शाळाबाह्य मुले असतील तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन त्यांच्या अहवालानुसार जर शाळाबाह्य मुले असतील तर तिथे शाळा सुरु करण्याचा निर्णय निश्चित घेतला जाईल, असे मंत्री भुसेंनी आश्वस्त केले. या शाळेतील विद्यार्थी आजही जमिनीवर झोपत असून त्यांच्यासाठी पलंगची सोय केली जाईल. तोरणमाळच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तपासणी करतील.
याबाबत आरोग्य मंत्र्यांना भेटणार असून या शाळेसाठी लवकरच रुग्णवाहिकादेखील उपलब्ध करुन दिली जाईल, असे भुसे यांनी सांगितले.
पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण उपलब्ध करुन देणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी सुरु करत आहोत. शिक्षकांची अशैक्षणिक कामे बऱ्याच प्रमाणात कमी केली आहेत. चांगल्या शिक्षकांची आयडियल बँक तयार करुन अनेक उपक्रम मार्गी लावत असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.
यावेळी या शाळेतील १६०० विद्यार्थ्यांना शिवसेनेकडून क्रीडा गणवेशाचे वाटप भुसे यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबईच्या उपसंचालक भावना राजनूर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भानुदास रोकडे, शिक्षणाधिकारी(माध्यमिक) वंदना वळवी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) प्राचार्य डॉ. दीपक साबळे, रमेश चौधरी, माजी शिक्षण सभापती गणेश पराडके, सीताराम पावरा, राकेश पावरा, जीवन रावतळे आदी उपस्थित होते.
