मालेगाव: टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या पक्ष,संघटनांच्या विरोधात भुसे समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना प्रणित मातोश्री टॅक्सी मालक-चालक युनियनतर्फे गुरुवारी मालेगावात शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रतिमेला ‘दुग्धाभिषेक’ घालत त्यांच्या कामकाजाचे जोरदार समर्थन करण्यात आले.
गेल्या १ जुलै रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले होते. टीईटी पेपरफुटी प्रकरणी भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. यानंतर गेल्या शनिवारी दादा भुसे यांनी स्वतः आंदोलक प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी येथे बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीतही आंदोलकांनी आपली ताठर भूमिका सोडली नाही आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. एवढेच नव्हे तर येत्या ८ दिवसांत पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत दिला होता.
..म्हणून समर्थकांनी घातला दुग्धाभिषेक!
टीईटी पेपरफुटी प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून शासन व शिक्षण मंत्री म्हणून भुसे यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीने याविषयी आक्रमक पवित्रा घेत भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासाठी देण्यात आलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याला चोख उत्तर देण्यासाठी भुसे समर्थक रस्त्यावर उतरले. येथील मोसम पुलाजवळ भुसे यांच्या प्रतिमेला त्यांनी दुग्धाभिषेक घातला. दादा भुसे यांची शिक्षण मंत्री म्हणून कारकीर्द वाखाणण्याजोगी आहे. सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या गुणवंत शिक्षकांना त्यांच्याकडून नेहमीच प्रोत्साहन दिले जाते, असा दावा समर्थकांनी केला.
शिक्षण मंत्र्यांचा काय दोष?
टीईटी परीक्षा महाराष्ट्र परीक्षा परिषद या स्वायत्त संस्थेतर्फे घेतली जाते. या पेपरफुटी प्रकरणात जे दोषी आढळून आले आहेत, त्यांना तातडीने अटक करण्यात आली आहे. यात शिक्षण मंत्री म्हणून दादा भुसे यांचा कोणताही दोष नाही. तरीही विरोधकांकडून त्यांना नाहक लक्ष्य करून त्यांची बदनामी केली जात आहे. हे राजकारण अत्यंत गलिच्छ असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो, अशा भावना भुसे समर्थकांनी व्यक्त केल्या.
जशास तसे उत्तर देणार..
लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र भुसे यांच्या निवासस्थानासमोर झालेल्या आंदोलनात अत्यंत अर्वाच्य आणि पातळी सोडलेल्या भाषेचा वापर करण्यात आला, असा आरोप भुसे समर्थकांनी केला. यापुढे जर अशा भाषेचा वापर करून आंदोलन केले, तर त्याला जशास तसे आणि चोख उत्तर दिले जाईल, असा थेट इशाराही यावेळी देण्यात आला. या दुग्धाभिषेक आंदोलनामुळे मालेगावातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या आंदोलनात माजी उपमहापौर नीलेश आहेर, रामा मिस्तरी, विनोद वाघ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
