जळगाव : दादर–भुसावळ (०९०५१/५२) या त्रिसाप्ताहिक विशेष गाडीची वेळोवेळी मुदत वाढवून खान्देशातील जळगावसह धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील प्रवाशांची सोय करण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेने आतापर्यंत केला. मात्र, ही गाडी यापुढील काळात कायमस्वरूपी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, ही गाडी नव्या क्रमांकासह (१९०४७/४८) नियमित सेवेत समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे.

विशेष गाडी नियमित झाल्यानंतर दादर–भुसावळ एक्स्प्रेसच्या तिकिट दरात तब्बल २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी तसेच रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकणार आहे. किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय अधिक बळकट होणार आहे. ही गाडी आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवार धावणार असल्याने मुंबई (दादर) ते भुसावळ दरम्यान खान्देशातील विविध स्थानकांना जोडणारी महत्त्वाची वाहतूक साखळी अधिक सक्षम होणार आहे.

विशेषतः मुंबईत नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी जाणाऱ्या खान्देशातील नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्राप्त माहितीनुसार, या गाडीला प्रवाशांचा सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळेच तिला कायमस्वरूपी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवासी संख्या, मागणी आणि सोयी सुविधांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भविष्यात या गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा विचारही रेल्वे प्रशासन करत आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे सर्व स्तरांतून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनीही या निर्णयाचे स्वागत करत खान्देशातील नागरिकांच्या दीर्घकाळापासून असलेल्या मागणीला न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे. या सुविधेमुळे प्रवास अधिक सुलभ, किफायतशीर आणि सुरक्षित होईल.

तसेच खान्देशाच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रवाशांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत असून, नियमित आणि किफायतशीर रेल्वे सेवेमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने भविष्यात आणखी सुविधा आणि नवीन रेल्वे गाड्या सुरु करुन खान्देशातील रेल्वेचे जाळे अधिक सक्षम करावे, अशी मागणीही प्रवाशांकडून होत आहे.

तूर्त विशेष गाडी म्हणून मुदतवाढ

दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून तूर्त दादर–भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ-दादर (०९०५०) दरम्यान आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी तीन एप्रिलपासून ३१ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय, दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ–दादर (०९०५२) दरम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी ३० मार्चपासून २९ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे.