आचारसंहिता भंगाची भरारी पथकामार्फत चौकशी करा

आमदारांमार्फत काही ठिकाणी ग्रीन जिम तसेच व्यायामशाळा साहित्याचे वाटप करण्यात आले.

दलित पँथरची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी

पदवीधर मतदारसंघ निवडणूक

जिल्ह्य़ासह विभागात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता सुरू असताना लोकप्रतिनिधी तसेच मंत्र्यांकडून मतदारांना आमिष दाखविणाऱ्या वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या, कामांचे भूमिपूजन करण्यात आले, अशी तक्रार दलित पँथरचे प्रवक्ते डॉ. गिरीश मोहिते यांनी केली आहे. या सर्व आचारसंहिता भंग प्रकरणांची भरारी पथकामार्फत चौकशी करण्यात येऊन तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे पदवधीर मतदारसंघ निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू असताना नाशिकमधील आमदारांनी व खासदारांनी मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार केले. वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी नाशिकमध्ये येऊन विकासकामासाठी पैसे दिल्याच्या व मतदारांना आमिष होईल अशा स्वरूपाच्या घोषणा या कालावधीत दिल्याची तक्रार मोहिते यांनी केली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत मतदारांना आमिष दाखविण्यासाठी नाशिक सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले. आमदारांमार्फत काही ठिकाणी ग्रीन जिम तसेच व्यायामशाळा साहित्याचे वाटप करण्यात आले. एमआयडीसीमध्ये कोटय़वधी रुपये किमतीच्या अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. या सर्व बाबी आदर्श आचारसंहितेच्या भंग करणाऱ्या आहेत.

महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पालिकेच्या वतीने किंवा लोकप्रतिनिधींच्या वतीने शहरात करण्यात आलेल्या कामांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मोहिते यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dalit panther complaint of code of conduct violations