scorecardresearch

धरणसाठा ४८ टक्क्यांवर; एक रिक्त, १० धरणांमध्ये निम्म्याहून कमी जलसाठा

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये सध्या ६४ टक्के जलसाठा असला तरी पिण्यासह शेतीच्या आवर्तनासाठी त्याचा विनियोग होईल.

dam water stock
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: अवकाळीच्या फेऱ्यानंतर मार्चअखेरीस पुन्हा एकदा उन्हाची दाहकता कमालीची वाढली असताना दुसरीकडे धरणातील जलसाठा ४८ टक्क्यांवर आला आहे. हवामान विभागाने अल निनोच्या प्रभावाने पर्जन्यावर विपरित परिणाम होण्याची धास्ती व्यक्त केली आहे. तीव्र उष्णतेमुळे बाष्पी भवनाचा वेग वाढून जलसाठा अकस्मात खालावण्याची भीती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सहा टक्के कमी जलसाठा आहे. जिल्ह्यातील एक धरण रिक्त झाले असून १० धरणांमध्ये निम्म्याहून कमी जलसाठा आहे.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये सध्या ६४ टक्के जलसाठा असला तरी पिण्यासह शेतीच्या आवर्तनासाठी त्याचा विनियोग होईल. पाण्याचा काळजीपूर्वक वापर होण्यासाठी प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार यंदा लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये ३१ हजार ४०७ दशलक्ष घनफूट (४८ टक्के) जलसाठा आहे. गेल्या वर्षी तो ३५ हजार ७१० दशलक्ष घनफूट म्हणजे ५४ टक्के इतका होता. यंदा उन्हाळा चांगलाच दाहक राहणार असल्याचे सध्याच्या हवामानावरून स्पष्ट होत आहे. तापमानाचा पारा ३२ अंशाचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. सकाळी दहा, अकरा वाजेपासून उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुपारी टळटळीत उन्हात फिरताना अक्षरश: जीव कासावीस होतो. एप्रिल आणि मे महिन्यात पारा कोणती पातळी गाठेल, याची चिंता सर्वांना सतावत आहे. दुसरीकडे पावसाचा हंगाम लांबल्यास टंचाईचे संकट घोंघावणार आहे. माणिकपूंज धरण कोरडेठाक झाले असून १० धरणांमध्ये १७ ते ४९ टक्के म्हणजे निम्म्याहून कमी जलसाठा आहे. उर्वरित धरणांमध्ये निम्म्याहून अधिक जलसाठा आहे.

गंगापूरमध्ये गतवर्षी इतकाच जलसाठा

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहात सध्या ६२८० दशलक्ष घनफूट (६२ टक्के) जलसाठा आहे. गंगापूर धरणात (६४), काश्यपी (८९), आळंदी (५२) तर याच गौतमी गोदावरीत केवळ ३० टक्के जलसाठा आहे. या समुहात गेल्या वर्षी इतकाच जलसाठा आहे. अल निनोच्या प्रभावाने पाऊस लांबल्यास उद्भवणाऱ्या स्थितीला तोंड देण्यासाठी विविध पर्यायांवर गांभिर्याने विचार केला जात आहे.

१० धरणांमध्ये निम्म्याहून कमी जलसाठा

उन्हाळ्याच्या तोंडावर माणिकपूंज हे धरण कोरडेठाक पडले आहे. गौतमी गोदावरी, करंजवण (प्रत्येकी ३० टक्के), वाघाड (२६), पुणेगाव (४९), तिसगाव (३८), कडवा (२९), भोजापूर (२६), केळझर (४३), नागासाक्या (१७), गिरणा (३३) टक्के जलसाठा आहे.

अन्य धरणांची स्थिती

पालखेड (५८), ओझरखेड (५९), दारणा (६३), भावली (५६), वालदेवी (८२), मुकणे (५९), नांदुरमध्यमेश्वर (९५), चणकापूर (५५), हरणबारी (५३), पुनद (८४) टक्के जलसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 14:46 IST

संबंधित बातम्या