भुजबळ-सेना आमदारात खडाजंगी

अलीकडेच नांदगाव शहर आणि परिसरास मुसळधार पावसाचा फटका बसला.

नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आपत्कालीन निधीतून मदत देण्याच्या विषयावरून शनिवारी पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात नांदगाव येथे आयोजित आढावा बैठकीत जोरदार खडाजंगी झाली.

अलीकडेच नांदगाव शहर आणि परिसरास मुसळधार पावसाचा फटका बसला. पुरामुळे शेतीसह शहरातील निवासी वस्ती, बाजारपेठेचे नुकसान झाले. यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पावसात शेतीसह  व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. बंधारे फुटले, अनेक रस्ते खचले, वाहून गेले. या नुकसान भरपाईसाठी कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवर  नांदगावातील पूरग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीकडून पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला आपत्कालीन निधी तातडीने उपलब्ध करण्याची मागणी कांदे यांनी केली. परंतु, भुजबळ यांनी कांदे यांना शांत राहण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन याविषयी निर्णय घेण्यात येईल. निधी मंजूर करण्यास काही मर्यादा असतात. अधिकाऱ्यांची स्वाक्षरी लागते, असे भुजबळ यांनी सांगितल्यानंतरळे सभागृहातील वातावरण बदलले. कांदे समर्थक  उपस्थित होते. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. भुजबळ हे जनतेची दिशाभूल करीत असून बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते. पण ते अनुपस्थित राहिल्याची तक्रार कांदे यांनी केली.

अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश भुजबळ यांनी दिले. नुकसान झालेले बंधारे व रस्त्याच्या कामाचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली. नांदगाव मतदारसंघ आधी राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. या मतदारसंघाचे पंकज भुजबळ प्रतिनिधीत्व करत होते. राष्ट्रवादीच्या ताब्यातून हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत कांदे यांनी खेचला होता. या खडाजंगीला राजकीय वर्चस्वाची किनार असल्याची चर्चा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Damage due to excessive rainfall farmers guardian minister chhagan bhujbal shiv sena mla suhas kande akp

ताज्या बातम्या