scorecardresearch

सिन्नरमध्ये गटार कामादरम्यान नळ जोडण्यांचे नुकसान

सिन्नर शहरातील सरदवाडी रस्त्यावरील एका कॉलनीत गटार कामा वेळी १५ ते २० नळ जोडण्यांचे नुकसान झाले.

(संग्रहीत छायाचित्र)

नाशिक : सिन्नर शहरातील सरदवाडी रस्त्यावरील एका कॉलनीत गटार कामा वेळी १५ ते २० नळ जोडण्यांचे नुकसान झाले. त्याची दुरुस्ती करण्याऐवजी नगरपालिका व ठेकेदाराने हात वर केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नळ जोडण्या पूर्ववत करण्यासाठी रहिवाश्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागला. काहींच्या जल वाहिन्यांचे नुकसान झाल्यामुळे जोडणीदेखील पूर्ववत झाली नाही.

सरदवाडी रस्त्यावर वाजे रो हाऊसलगतच्या कॉलनीत गटारीचे काम प्रगतीपथावर आहे. खोदकामात १५ ते २० घरांतील नळ जोडण्या तोडल्या गेल्या. त्या पूर्ववत करण्याची तसदी घेतली गेली नाही. याबाबत विचारणा केली असता वैयक्तिक पातळीवर दुरुस्तीचा सल्ला दिला गेला. खोदकामात काहींच्या जल वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. त्या जोडण्या पूर्ववत करण्यास रहिवाश्यांना मोठा खर्च येणार आहे. उर्वरित नळ जोडण्या पूर्ववत करण्यास प्रत्येकी ४०० ते ५०० रुपये खर्च करावे लागले. या प्रकाराबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, या प्रकाराबद्दल पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता हेमलता दसारे यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधून त्या उपलब्ध झाल्या नाहीत.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Damage plumbing connections sewer work ysh

ताज्या बातम्या