scorecardresearch

नाशिक: अवकाळीसह गारपिटीने ८०७९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

जिल्हा प्रशासन आणि कृषी सहायकांच्या मदतीने पंचनाम्याचा अहवाल प्रशासनाकडे पाठविण्यास सुरूवात झाली आहे.

farm loss nashik
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: जिल्ह्यात पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ८०७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांना अवकाळीचा तडाखा बसला असून पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २१ हजार ७५० इतकी आहे. जिल्हा प्रशासन आणि कृषी सहायकांच्या मदतीने पंचनाम्याचा अहवाल प्रशासनाकडे पाठविण्यास सुरूवात झाली आहे.

काही दिवसांपासून ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाचा तडाखा बसत असल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. जिल्ह्यात १५ ते १९ मार्च या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात हजेरी लावली. काही भागात गारपीट झाली. या गारपिटीमुळे रब्बी पिकांना चांगलाच फटका बसला असून अनेक भागात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यात पेठसह नांदगाव, नाशिक, सुरगाणा, कळवण भागात गारपीट झाली. ढगाळ वातावरण आणि त्यातच गारपीट झाल्याने द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. कांदा, गहु भुईसपाट झाले आहेत.

आणखी वाचा- नंदुरबार: एकाच महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात ५६७४ हेक्टर पिकांचे नुकसान

प्राप्त आकडेवारीनुसार पेठ, नांदगाव, निफाडमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक भागात शेतातील पिकांच्या सऱ्यांमध्ये गारपीट झाल्यानंतर कित्येक तास गारांचा खच तसाच पडून होता. आधीच शेतमालाला भाव नसताना त्यात अस्मानी संकट कोसळल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. अद्याप या नुकसानीचे पंचनामे होत नाही तोच २४ मार्चपासून पुन्हा अवकाळीचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकरी धास्तावला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला असून ३५५६ हेक्टरवरील कांद्याचे तर, १५९५ हेक्टरवरील गहु पिकाचे नुकसान झाले आहे.

तालुकानिहाय नुकसान

तालुका नुकसान (हेक्टर)
नांदगाव २४४३.१०

कळवण ८३२.३०
देवळा २४४.५०

दिंडोरी ४२
नाशिक ३८.६०

त्रयंबकेश्वर ४०.२५
पेठ १५८१.७६

इगतपुरी ८७
निफाड १५१४.५०

सिन्नर ८.५०
चांदवड ५०५

येवला ५०१.५०
एकूण ८०७९.१५

पीकनिहाय झालेले नुकसान

पिके नुकसान (हेक्टर)
कांदा ३५५६.८६
गहु १५९५.७२

भाजीपाला ४३६.२०
द्राक्षे ७८२.६७

आंबा १०३४.३०
डाळींब ३५

कांदा रोपे ५१०
टोमॅटो १४

हरभरा ७५

Nashik News (नाशिक / उत्तर महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 14:16 IST

संबंधित बातम्या