scorecardresearch

नाशिक: महिलेची धिंड काढण्याचा प्रकार अंधश्रद्धेतून…; जादुटोणा विरोधी कायद्यातंर्गत गुन्ह्याची अंनिसची मागणी

जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना याविषयी समितीतर्फे निवेदन देण्यात आले आहे.

crime 22
सैन्यातील मुलांच्या वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली डॉक्टरची फसवणूक (प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता )

चांदवड तालुक्यातील शिवरे या गावात विधवेचे तोंड काळे करून आणि चप्पलांचा हार घालून धिंड काढण्यात आल्याचा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असून जादुटोणा विरोधी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे मुख्य सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.

हेही वाचा >>>नाशिक: पिफ महोत्सवात नाशिकच्या दिग्दर्शिकेचा ‘गिरकी’

जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना याविषयी समितीतर्फे निवेदन देण्यात आले आहे. वडनेर भैरव पोलीस ठाण्यातील आधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. पतीच्या निधनानंतर सासरच्या लोकांशी संबंधित महिलेचे वाद झाले होते. त्यातूनच पतीच्या दशक्रिया विधीच्या दिवशी तिची धिंड काढण्यात आली. या घटनेत गुन्हा दाखल होत नव्हता. अंनिसने प्रभावी हस्तक्षेप केल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यामार्फत पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षक यांना गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्यावर गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा >>>जळगाव : तीनशे रुपयांचा मोह अन् तलाठी जाळ्यात

या घटनेमागे अंधश्रद्धा असावी, अशी शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. ती शक्यता खरी ठरल्याचे अंनिसने म्हटले आहे. महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार संशयितांनी संबंधित विधवेच्या अंगात देवी आली, तिची पूजा करा, तिची मिरवणूक काढा, असे म्हटले आहे. सदरचे कृत्य हे जादुटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याने त्या कायद्याचे कलम लावावे, अशी मागणी डाॅ. गोराणे, चांदगुडे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 19:50 IST