नाशिक – येथील ओडिसी नृत्यसाधक मानसी अहिरे यांचा रंगमंच प्रवेश कार्यक्रम बुधवारी सायंकाळी सहा वाजता महाकवी कालिदास कला मंदिर येथे होणार आहे.मानसी ही नृत्यसाधना कला प्रबोधिनीच्या गुरू डॉ. संगीता पेठकर यांची शिष्या आहे. सात ते दहा वर्षांहून अधिक काळ गुरूंकडून नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यानंतर शिष्य रंगमंचावर स्वतंत्र सादरीकरणास सज्ज होतो.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ओडिसी नृत्याच्या ज्येष्ठ गुरू झेलम परांजपे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आयआयटी मुंबईचे प्रा. संजीव श्रीवास्तव, प्रा. दर्शन शाह आणि स्पेक्ट्रमचे संचालक कपिल जैन उपस्थित राहणार आहेत.
विज्डम हाय शाळेत शिक्षण घेणाऱ्या मानसीने आयआयटी मुंबई येथून यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी संपादित केली. १५ वर्षांपासून डॉ. संगीता पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओडिसी नृत्यात निपूणता मिळवत आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ओडिसी नृत्याची पदविका मिळवली. या प्रवासात वडील देवेंद्र अहिरे आणि आई सुवर्णा अहिरे यांचे भक्कम पाठबळ लाभले. आजवर अनेक सामूहिक कार्यक्रमांमध्ये मानसीने सहभाग घेतला आहे. कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.