नाशिक : नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याचे सालीम अली म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ता उगावकर यांना नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने पर्यावरण मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. विठ्ठल सोनवणे, माजी उपमहापौर मनीष बस्ते,वैद्य विक्रांत जाधव यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष प्रा.आनंद बोरा यांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला.

१० वर्षांपासून नेचर क्लबतर्फे जिल्ह्यतील निसर्ग,पर्यावरणावर काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. ४० वर्षांपासून पक्षीनिरीक्षण आणि पक्षी संवर्धनाचे काम करणारे उगावकर हे पर्यावरण संवर्धनाचे काम करत आहेत.  पक्षीतज्ज्ञ डॉ.सालीम अली यांच्या समवेतही त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष देखील राहिले असून पक्ष्यांचे सचित्र शो, चर्चासत्र, निसर्ग शिबीरे आदीचे विविध शाळा-महाविद्यालात त्यांनी आयोजन केले आहे. यावेळी मनोगत व्यक्त करतांना उगावकर यांनी मागील काही वर्षांत पक्षीमित्रांची संख्या वाढली असून केवळ पक्ष्यांची छायाचित्र न काढता पक्ष्यांचा अभ्यास होवून त्यांचे कागदीकरण होण्याची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना पक्षी संवर्धन चळवळीत आणणे आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मांडले. प्रास्ताविक प्रा. आनंद बोरा, सूत्रसंचालन सागर बनकर यांनी के ले. आभार अपूर्व नेरकर यांनी मानले.