नाशिक – ब्लू बॅंड इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशीपच्या (आयएनआरसी) रॅली ऑफ महाराष्ट्र या सहाव्या आणि अखेरच्या फेरीत अपेक्षेप्रमाणे मंगळुरच्या डीन मस्कारेन्हास-करूबाह गगन (टीएसआय रेसिंग) या जोडीने विजेतेपद मिळविले. अरेका मोटारस्पोर्टस्च्या कर्णकदूर-मुसा शेरीफ जोडी उपविजेती ठरली.
नाशिक परिसरात या फेरीचे आयोजन रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विसाया संस्थेने केले. रविवारी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, ब्लु बॅंडचे फेडरिक, नितीन मुनोत, संजय अब्राहम, श्री. के. मधुसुदन यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा झाला. जलज शर्मा आणि ब्लु बॅंडचे प्रेम काशिनाथ यांनी विसाचा रौप्य महोत्सव आणि उत्कृष्ठ आयोजनांबद्दल शुभेच्छा देण्याबरोबरच कौतुक करत इतर संस्थांनी त्यांचा आदर्श ठेवून आपले काम करावे, असे सांगितले. पारितोषिकानंतर सर्व विजेत्यांनी एकच जल्लोष केला.
आयएनआरसीच्या इतर गटांमधील विजेत्यांमध्ये फिलोपियस मथाई-हरीश के. एन. (स्नॅप रेसिंग), विशाखा बी.-चेरथ जैन (चेटीनाड स्पोर्टिंग), जीत जाभक- व्ही. शेखर (जेए मोर्टारस्पोर्टस्), अभिन राय-जयशैर मोईद्दिन (अभिन टिम), थारूषी विक्रम-मुकूंद राय वैभव (चेटीनाड स्पोर्टिंग), पी. सतीश-के.आर..ऋषिकेश (आर- टेक मोटारस्पोर्टस्), जिप्सी गटात संजय अग्रवाल- धिरज माने (अग्रवाल संजय टिम) यांचा समावेश आहे.
वळणावळणाचे डांबरी रस्ते, अचानक समोर येणारे उंचवटे हे मोटारचालकांनी अचूक नियोजन करत तसेच मोटारीवर पूर्णपणे ताबा, नियंत्रण ठेवत सहजपणे पार केले. त्यामुळे कुठेही चुरशीचा खेळ आज पहायला,अनुभवायला मिळाला नाही. पोशेरा ते हिरवेगाव, करोली ते ओसीरवारा आणि कळंब ते खारवळ हे सर्व अंतर अतिशय सुत्रबध्दपध्दतीने पार करत सर्व चालक सपकाळ नॉलेज हब येथील सर्व्हिस पार्कवर सकाळी साडेदहापर्यत सुखरूप येऊन पोहचले.
वेस्टर्न इंडिया स्पोर्टस असोसिएशन अर्थात विसा ही संस्था मोटार स्पोर्टस रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी ओळखली जाते. त्यामुळे फेडरेशन ऑफ मोटारस्पोर्टस क्लब्ज ऑफ इंडिया (एफएमएससीआय) यांच्याकडून वेळोवेळी विसाकडे इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशीपच्या एका फेरीच्या आयोजनाची जबाबदारी दिली जाते. विसाकडून ही जबाबदारी कायमच उत्कृष्ट रितीने पेलण्यात आली आहे. यंदा आयएनआरसीच्या शेवटच्या म्हणजे सहाव्या फेरीचे आयोजन करण्याचा मान विसाला त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मिळाला. सर्व स्पर्धकांकडून विसाच्या आयोजनाचे कौतुक करण्यात आले. सर्व स्पर्धकांची योग्य प्रकारे देखभाल विसाकडून करण्यात आली.
