नाशिक – मालेगाव शहरालगतच्या दाभाडी शिवारातील रोकडोबानगर येथील एका लाकडाच्या वखारीत लाकूड कापण्याच्या पात्यात सापडून तरुणाचा मृत्यू झाला. ही आत्महत्या की अपघात हे तपासानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती मालेगाव कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेश गुंजाळ यांनी दिली.

रोकडोबानगर येथील गोकुळ पवार (२८) असे या तरुणाचे नाव आहे. गोकुळ हा रोकडोबानगरजवळच असलेल्या अन्नपूर्णा वखार येथे कामगार म्हणून कामाला होता. बुधवारी सकाळी ११ वाजता कामावर गेला. तो लाकूड कापण्याच्या पात्याच्या दिशेने जात असताना पात्यावर पडला. यात त्याचे शिर धडावेगळे झाले. या घटनेची माहिती मिळताच कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक गुंजाळ यांच्यासह छावणी पोलिसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. यासंदर्भात गुंजाळ यांनी, आम्ही घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले असून यात गोकुळ हा एकटाच दिसत असल्याने त्याने आत्महत्या केली की तोल जावून तो पडला, हे तपासाअंतीच कळणार असल्याचे सांगितले. गोकुळचा मृतदेह मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला. गोकुळच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of a young man caught in the act of cutting wood amy