नंदुरबार : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) माध्यमातून देशाने क्षेपणास्त्र, रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (ईडब्ल्यू) व्यवस्था, नौदल प्रणाली आणि सुरक्षित दळणवळणाच्या क्षेत्रात स्वयंपूर्णता मिळवली आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या विविध संरक्षण प्रणालींच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या संरक्षण साहित्याचे निर्यात मूल्य सध्या सुमारे १२ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचले असून, आगामी काळात हा आकडा ५० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती डीआरडीओचे महासंचालक डॉ. रवींद्र सिंह यांनी दिली. पत्रसूचना कार्यालयाच्या वतीने आयोजित आकांक्षित जिल्ह्यांतील पत्रकारांच्या दिल्ली अभ्यास दौऱ्यादरम्यान डीआरडीओ कार्यालयाला भेट देण्यात आली.

संस्थेची कार्यप्रणाली, संशोधन आणि देशाच्या संरक्षण क्षेत्रातील योगदानाची माहिती जाणून घेतली. यावेळी डॉ. रवींद्र सिंह यांनी संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी संशोधनाबरोबरच प्रसारमाध्यमांची भूमिका आणि संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांवर प्रकाश टाकला.भारताची संरक्षण क्षमता बळकट करण्यात डीआरडीओची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मांडतांना डाॅ. सिंह यांनी.‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये डीआरडीओने विकसित केलेल्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीने बजावलेल्या भूमिकेचा उल्लेख केला. भारत-जर्मनी तंत्रज्ञान सहकार्याच्या माध्यमातून विकसित झालेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढती मागणी आहे.

त्यामुळे भारताच्या संरक्षण साहित्य निर्यातीत सातत्याने वाढ होत असून, ही बाब संरक्षण क्षेत्रासाठी समाधानकारक आहे. एमबीटी अर्जुन, झोरावर यांसारख्या रणगाड्यांसाठी आवश्यक तंत्रज्ञान तसेच आयएनएस विक्रांतसारख्या विमानवाहू युध्दनौका निर्मितीत वापरण्यात आलेले विशेष प्रकारचे पोलाद विकसित करण्यामध्येही डीआरडीओचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. देशाची संरक्षण परिसंस्था स्वदेशी शस्त्रास्त्रनिर्मिती, नवउद्यम आणि संशोधन संस्थांचे जाळे मजबूत करून आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशाच्या विविध भागांतील औद्योगिक वसाहतींनाही ( डिफेन्स कॉरिडॉर) संरक्षण उत्पादनाच्या दृष्टीने सक्षम केले जात आहे.

सुमारे ६८ वर्षांपासून कार्यरत असलेल्या डीआरडीओमध्ये सध्या ७,२०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली तसेच हायपरसॉनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली विकसित करण्यावर डीआरडीओचा विशेष भर राहणार असल्याचे डॉ. सिंह यांनी नमूद केले. यावेळी डीआरडीओचे मुख्य प्रवक्ता बिपीनकुमार कौशल, पत्रसूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी स्वामी, माध्यम व संपर्क अधिकारी श्रीयंका चटर्जी उपस्थित होते.