scorecardresearch

हुडहुडी..

हवामानातील बदलामुळे जिल्ह्यावर दाटलेले धूळ आणि धुक्याचे मळभ काहीसे दूर होत असताना सोमवारी हंगामातील ६.६ ही नवीन नीचांकी पातळी गाठली गेली.

पारा ६.६ अंशावर;  ग्रामीण भागात थंडीचा तडाखा अधिक असून निफाडमध्ये पारा नाशिकपेक्षा खाली

नाशिक : हवामानातील बदलामुळे जिल्ह्यावर दाटलेले धूळ आणि धुक्याचे मळभ काहीसे दूर होत असताना सोमवारी हंगामातील ६.६ ही नवीन नीचांकी पातळी गाठली गेली. एकाच दिवसात तापमान ८.२ अंशांनी घसरल्याने सर्वत्र हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात थंडीचा तडाखा अधिक असून निफाडमध्ये पारा नाशिकपेक्षा खाली गेल्याचे सांगितले जाते. घसरत्या तापमानाने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. विवारी नाशिकसह परिसरात धूळ आणि धुक्याचे मळभ निर्माण झाले होते. धूलिकणांमुळे दिवसभर दृश्यमानता कमी झालेली होती. सोमवारी सकाळी ही स्थिती बदलली आणि किमान तापमानात लक्षणीय बदल झाल्याचे पाहायला मिळाले. धूळ आणि धुके कमी होऊन आकाश निरभ्र झाले. रविवारी १४.०८ अंश या किमान तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी ते ६.६ अंशापर्यंत खाली आले. तापमानात वेगाने बदल झाल्याने रात्रीपासून थंडीची तीव्रता जाणवू लागली. त्यात बोचऱ्या वाऱ्याची भर पडली. या स्थितीमुळे बहुतेकांना दिवसभर उबदार कपडय़ांचा आधार घ्यावा लागला.

करोनाच्या सावटामुळे बंद झालेल्या शाळा या दिवशी उघडल्या. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थंडीपासून बचावासाठी चांगलीच कसरत करावी लागली. कमालीच्या गारठय़ाने सकाळी व्यायाम आणि भ्रमंतीला घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या काहीशी कमी झाली. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा नाशिकच्या तापमानावर प्रभाव पडतो. उत्तरेकडील अनेक भागांत बर्फवृष्टी होत आहे. त्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अजूनही गारवा वाढू शकतो. थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. गेल्या १० जानेवारी रोजी ७.३ अंश या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. पंधरवडय़ात तापमान त्यापेक्षा खाली घसरले. मागील तीन ते चार वर्षांत तापमान ५.७ आणि सहा अंशापर्यंत गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे पुढील काळात ते आणखी घसरते की काय, याकडे सर्वाचे लक्ष आहे. दरम्यान, शहरापेक्षा ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक आहे. पारा घसरत असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये धास्ती आहे. अवकाळीत आधीच बागांचे मोठे नुकसान झाले होते. तापमान असेच खाली गेल्यास बागांवर रोगराईचे प्रश्न उभे राहतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

निफाडमध्ये तीव्रतेचे कारण?

निफाड हा समुद्रसपाटीपासून ५६९ मीटर उंचीवरील सखल भूभाग असून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे उंच डोंगर किंवा पर्वत नाही. निफाडमधील समतल भागावर हवेची घनता जास्त आढळून येते. या ठिकाणी हवेचा थर साठून राहतो. जास्त घनतेची हवा ही जास्त दाबाचा भाग बनवते. जास्त दाबाचा भाग म्हणजेच कमी तापमान असे सूत्र आहे. त्यामुळे निफाडचे तापमान नेहमीच कमी आढळते, असे भौतिकशास्त्राचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. या शिवाय निफाडमध्ये हिरवीगार झाडे, बागायती शेती, यांची रेलचेल आहे. गोदावरीचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. जमिनीत पाण्याचे प्रमाण अधिक आहे. जमिनीचे तापमान कमी ठेवण्यास ते कारक ठरते. या भागात वाऱ्याची गती कमी आढळते. तो तापमान कमी ठेवण्यास महत्वाचा भाग ठरतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Degrees rural areas cold atmosphere ysh

ताज्या बातम्या