नाशिक – शहराच्या मध्यवर्ती असलेल्या रविवार कारंजा या दाटीवाटीच्या भागात प्रदीर्घ काळ दिमाखात उभी राहिलेली आणि कालौघात जिर्णावस्थेत पोहोचलेली यशवंत मंडई या व्यापारी संकुलाच्या पाडकामास मंगळवारी अखेर सुरुवात झाली. जवळपास ६० वर्ष जुनी ही इमारत आहे. ती पाडून या ठिकाणी बहुमजली वाहनतळ अथवा व्यावसायिक संकुल उभारण्याची महापालिकेची योजना आहे.
शहरातील अतिशय वर्दळीच्या भागातील ही इमारत पाडण्याचे काम महापालिकेने खासगी संस्थेला दिले आहे. त्यासाठी तीन महिन्यांची मुदत आहे. परंतु, महिनाभरात हे काम होईल, असे सांगितले जाते. मंगळवारी इमारतीच्या पाडकामास सुरुवात झाली. ते अतिशय दक्षतापूर्वक व हळुवारपणे करावे लागणार आहे. सावधानतेचे फलक लावून महापालिकेने हे काम सुरू केले.
जुन्या मोडकळीस आलेल्या या इमारतीमुळे संकट ओढावण्याची शक्यता असल्याने महापालिकेने काही वर्षांपूर्वीच ती पाडण्याचे निश्चित केले होते. त्या अनुषंगाने यशवंत मंडईतील भाडेकरूंना नोटीस बजावत संकुल रिकामे करण्यास सांगण्यात आले. संबंधितांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत यशवंत मंडई इमारतीच्या संरचनेचे परीक्षण केले. तेव्हा ती असुरक्षित व राहण्यायोग्य नसल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयाने भाडेकरूंची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या इमारतीच्या पाडकामास अखेर मुहूर्त लागला.
नाशिक नगरपालिकेच्या काळात यशवंत मंडई व्यापारी संकुलाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. १९ डिसेंबर १९६५ रोजी तत्कालीन संरक्षणमंत्री आणि नाशिकचे खासदार यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या इमारतीची पायाभरणी झाली. रविवार कारंजा चौकात यशवंत मंडईची इमारत दिमाखात उभी राहिली. प्रदीर्घ काळ महत्वाचे व्यापारी संकुल म्हणून ओळखली गेली. काही वर्षांपासून प्रभाग क्रमांक २३ मधील या मोडकळीस आलेल्या इमारतीचा विषय चर्चेत होता. या ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्यावर अनेकदा मंथन झाले. या जागेत नव्याने व्यापारी संकुल उभारण्याची मागणी आहे. तथापि, इमारत पाडल्यानंतर या ठिकाणी कोणता प्रकल्प राबविला जाईल. याविषयी स्पष्टता झालेली नाही.