मनमाड : शिवसेनेत बंड झाल्यानंतर सर्वात आधी एकनाथ शिंदे गटास जाऊन मिळणाऱ्यांमध्ये नांदगावचे बाहुबली आमदार सुहास कांदे यांचा समावेश होता. बंडखोर आमदार आणि मंत्र्यांच्या निषधार्थ नाशिक शहरात सेना पदाधिकाऱ्यांनी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. तथापि, बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसैनिक अद्याप एकवटले नव्हते. ती कसर बुधवारी मनमाडच्या शिवसैनिकांनी भरून काढली. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ त्यांनी रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या राज्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. याद्वारे शिवसेना पक्षप्रमुखांना समर्थन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्यात बंडखोर आमदारांचा निषेध करण्यात आला. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. हे दाखवून देण्यासाठी शहरातून भव्य समर्थन फेरी काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेनेच्या फेरीला पोलिसांनी परवानगी नाकारली, त्यामुळे शिवसेनेतून नाराजीचे सूर उमटले. तसेच फेरीचे लावलेले फलकही पोलीस आणि पालिका प्रशासनाने काढून घेतल्याने चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करून चौकातील चारही रस्त्यांवर लोखंडी जाळय़ा लावण्यात आल्या. मनमाडसह बाहेर गावाहून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonstration of strength of shiv sainiks in the constituency of rebel mla zws
First published on: 30-06-2022 at 00:05 IST