जळगाव : जिल्ह्यातील प्रवाशांना मनमाड, नाशिकहून सकाळी लवकर येण्यासाठी देवळाली–भुसावळ मेमू रेल्वे गाडी सोयीची असली, तरी तिची सुटण्याची वेळ खूपच गैरसोयीची आहे. करोनापूर्वी ही गाडी पहाटे पाच वाजता देवळालीहून सुटत होती. त्यामुळे नाशिकमधील खान्देशवासियांना जळगावला १० वाजेपर्यंत पोहोचता येत असे.

११११३ देवळाली ते भुसावळ दरम्यान धावणारी मेमू रेल्वे गाडी करोनापूर्वी पहाटे पाच वाजता देवळालीहून सुटत होती. या वेळापत्रकामुळे नाशिक परिसरातील खान्देशवासी प्रवासी सकाळीच प्रवास करून जळगाव व भुसावळ येथे सकाळी १०-११ वाजेपर्यंत पोहोचू शकत होते. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरत होती. मात्र, सध्या या गाडीची देवळालीहून सुटण्याची वेळ पहाटे पाच ऐवजी सकाळी ७.२० अशी करण्यात आली आहे. प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. पूर्वीची वेळ बदलल्यामुळे चाळीसगाव, पाचोरा तसेच जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना सकाळच्या वेळेत कार्यालय, महाविद्यालये व व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचणे कठीण झाले आहे.

नोकरदार, विद्यार्थ्यांना मेमूच्या वेळेचा फटका

पूर्वी ही गाडी सकाळी लवकर जळगाव, भुसावळला पोहोचत असल्याने प्रवाशांना दिवसभराची कामे नियोजनबद्धरीत्या करता येत होती. मात्र, आता उशिरा सुटणाऱ्या गाडीमुळे जळगाव, भुसावळ येथे दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचावे लागत असल्याने अनेकांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फटका बसत आहे. काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन तास चुकवावे लागत असून, नोकरदार वर्गाला कार्यालयीन वेळ पाळणे अवघड झाले आहे. व्यापारी वर्गालाही बाजारपेठेतील सकाळची उलाढाल गमवावी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. मेमू गाडी खान्देश व नाशिक जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून, तिची पहाटेची वेळ कायम ठेवणे आवश्यक आहे.

पाचोऱ्यात मेमू ८.३० वाजता पोहोचावी

करोनानंतर अनेक गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्यात आले असताना, देवळाली–भुसावळ मेमू गाडीच्या वेळेत मात्र सुधारणा न झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाने देवळाली–भुसावळ मेमू गाडीची पहाटे पाचची वेळ पुन्हा लागू करावी. जेणेकरून ती भुसावळकडे जाताना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर सकाळी ७.४५ वाजता, पाचोरा रेल्वे स्थानकावर सकाळी ८.३० वाजता पोहोचेल, अशी मागणी पाचोरा-भडगाव ग्राहक सेवा संघाच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांच्याकडेही केली. गुप्ता यांनी भुसावळ विभागातील रेल्वेच्या विविध विकास कामांची पाहणी करण्यासह सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी आल्यावर पाचोरा स्थानकावर सुद्धा भेट दिली. यावेळी ग्राहक सेवा संघाने देवळाली–भुसावळ मेमू गाडीची वेळ पूर्ववत करणे किती गरजेचे आहे, याकडे प्रामुख्याने लक्ष वेधले.