लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: चाळीसगाव, पाचोरा ते जळगाव येथील नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली देवळाली-भुसावळ एक्स्प्रेस (शटल) लवकरच पूर्वनिर्धारित वेळेनुसार सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. अमृत भारत योजनेत पाचोरा रेल्वे स्थानकाचा समावेश झाला असून, त्यासाठी ३७ कोटींचा विकासनिधी मंजूर झाला आहे.




खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वात पाचोरा येथील भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह पाचोरा रेल्वेस्थानक सल्लागार समितीच्या शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री दानवे आणि रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार लाहोटी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्यावेळी देवळाली- भुसावळ शटल लवकरच पूर्वनिर्धारित वेळेनुसार धावेल, असे आश्वासन दानवे आणि लाहोटी यांनी शिष्टमंडळाला दिले. खानदेशातील प्रवाशांच्या सोयीची शटल रेल्वेसेवा म्हणजेच देवळाली- भुसावळ एक्स्प्रेसच्या वेळेत करोनाकाळात बदल झाला होता. परिणामी मनमाड ते भुसावळदरम्यान रोज ये-जा करणारे प्रवासी, नोकरदारांचे प्रचंड हाल झाले होते.
आणखी वाचा-धुळ्यात राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा; एका गटाने कार्यालयाला कुलूप लावलं, तर दुसऱ्या गटाने…
प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन खासदार पाटील यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष शिंदे, पाचोरा रेल्वेस्थानक सल्लागार समितीचे सदस्य तथा प्रवासी परिषदेचे सरचिटणीस प्रभू पाटील, सल्लागार सदस्य गिरीश बर्वे, अनिल चांदवानी, राजेंद्र बडगुजर, नीलेश कोटेचा यांनी नवी दिल्ली गाठत दानवे आणि लाहोटी यांची भेट घेतली. याप्रसंगी मंत्री आणि रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांनी शटल रेल्वेची आवश्यकता व उपयोगिता जाणून घेतली. शटलच्या पूर्वनिर्धारित वेळेला पर्याय म्हणून अजंता एक्स्प्रेस मनमाडऐवजी भुसावळपासून सुरू करण्याबाबत आणि धुळे ते चाळीसगाव मेमो रेल्वेसेवा जळगावपर्यंत वाढविण्याबाबत ही सकारात्मक चर्चा झाली.