नाशिक : शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी कृषी उत्पादने तसेच अन्य माल देशातील विविध बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या देवळाली–दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेने शनिवारी (५ सप्टेंबर) १०० वी फेरी पूर्ण केली. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागासाठी ही महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते १५ ऑक्टोबर २०२४ रोजी हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. देवळाली ते दानापूरदरम्यान दर शनिवारी ही रेल्वे धावते. रेल्वेला १० पार्सल व्हॅन आणि १० सामान्य श्रेणीचे डबे असून, प्रत्येक पार्सल व्हॅनची क्षमता २३ टन आहे.

१०० फेऱ्यांदरम्यान या रेल्वेतून एकूण १४,०७०.१० टन पार्सल मालाची वाहतूक झाली. त्यामध्ये ५,४७२.५० टन नाशवंत वस्तू, तर ८,५९५.६१ टन हार्ड पार्सलचा समावेश आहे. पार्सल वाहतुकीतून रेल्वेला सुमारे ५.१४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय ४६,७२७ प्रवाशांनी या रेल्वेने प्रवास केला असून, प्रवासी वाहतुकीतून सुमारे १.२० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

डाळिंब, कांदा, सीताफळ, आले, द्राक्षे आणि लिंबू यांसारख्या कृषी उत्पादनांसह बिस्किटे, चॉकलेट, कँडी, हग्गीज, बॅग, प्लास्टिक वस्तू, कापड, खाद्यपदार्थ आणि औषधांचीही या रेल्वेतून मोठ्या प्रमाणावर वाहतूक करण्यात आली. आइस फिश, भेंडी, पानाची पाने, पेरू, शेवगा, कोथिंबीर, खरबूज, फुलकोबी, संत्री, आंबे, बीन्स, बोर, गाजर, मिश्रित फळे आणि अंडी यांसारख्या विविध नाशवंत वस्तूही या माध्यमातून बाजारपेठेत पोहोचविण्यात आल्या.

नाशिक परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांना दूरच्या बाजारपेठांपर्यंत माल पोहोचविण्यासाठी या सेवेमुळे किफायतशीर आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला आहे. कृषी मालाची वाहतूक सुलभ झाल्याने कृषी आधारित अर्थव्यवस्थेलाही या सेवेचा हातभार लागत असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

सर्वाधिक वाहतूक झालेल्या वस्तू

या रेल्वेतून सर्वाधिक ६,३५३.२४ टन बिस्किटे, चॉकलेट आणि कँडी, तर १,६५०.६९ टन कांदा आणि १,४८७.१२ टन डाळिंबाची वाहतूक झाली. याशिवाय २५९.३५ टन सीताफळ, २०१.९१ टन आले, १२९.८५ टन द्राक्षे आणि ११९.०६ टन लिंबांची वाहतूक करण्यात आली. हग्गीज, प्लास्टिक बॅग, प्लास्टिक मॅट, कापड, खाद्यपदार्थ आणि औषधांसह विविध नाशवंत वस्तूही या रेल्वेतून पाठविण्यात आल्या.

१०० फेऱ्यांची कामगिरी

देवळाली–दानापूर विशेष रेल्वेने आतापर्यंत १४,०७०.१० टन पार्सल मालाची वाहतूक केली असून, त्यातून रेल्वेला सुमारे ५.१४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. यामध्ये ५,४७२.५० टन नाशवंत वस्तू आणि ८,५९५.६१ टन हार्ड पार्सलचा समावेश आहे. या सेवेतून आतापर्यंत ४६,७२७ प्रवाशांनी प्रवास केला असून, प्रवासी वाहतुकीतून सुमारे १.२० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.