विश्वात्मक स्नेहभाव पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर मनमाडकरांना पालखी सोहळय़ाचे दर्शन

टाळ, मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष, पाऊली आणि रिंगण, डौलाने फडकणारे भगवे ध्वज अशा उत्साहात सोमवारी सायंकाळी  येथील दत्तमंदिर प्रांगणातून शहराचे अध्यात्मिक आणि धार्मिक भूषण असलेला विश्वात्मक स्नेहभाव पालखी सोहळा पंढरपूरसाठी मार्गस्थ झाला.

palkhi
मनमाडहून पंढरपूरच्या दिशेने निघालेली विश्वात्मक स्नेहभाव पालखी

मनमाड : टाळ, मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष, पाऊली आणि रिंगण, डौलाने फडकणारे भगवे ध्वज अशा उत्साहात सोमवारी सायंकाळी  येथील दत्तमंदिर प्रांगणातून शहराचे अध्यात्मिक आणि धार्मिक भूषण असलेला विश्वात्मक स्नेहभाव पालखी सोहळा पंढरपूरसाठी मार्गस्थ झाला. तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर मनमाडकरांना पालखी सोहळय़ाचे दर्शन घडले. १९ दिवसांचा पायी प्रवास करत नऊ जुलै रोजी पालखी पंढरपूर येथे विसावणार आहे. या पालखी सोहळय़ाचे यंदाचे ४२ वे वर्ष आहे.

श्री संत कैकाडी महाराज, कोंडीराम काका, लहरीनाथ महाराज (साळीबाबा) या संत महात्म्यांचा पालखी सोहळा दरवर्षी आषाढी एकदशीनिमित्त मनमाड ते (आनंदपुरी) श्रीक्षेत्र पंढरपूर असा जात असतो. रामदास महाराज हे या पालखी सोहळय़ाचे नेतृत्व करत होते. गतवर्षी त्यांचे निधन झाले. शिवाय करोनाच्या प्रादुर्भावामुळे पालखी सोहळा स्थगित करावा लागला होता. यंदा मात्र सर्व निर्बंध शिथिल झाल्याने मनमाडचा हा पालखी सोहळा यंदा मार्गस्थ झाला. मनमाडकरांनीही ढोल-ताशांच्या गजरात पालखी सोहळय़ाला निरोप दिला. या पालखी सोहळय़ाबरोबर यंदा बाळासाहेब महाराज इप्पर हे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज नगरजवळील दत्त मंदीर प्रांगणात पालखी प्रस्थानाचा सोहळा रंगला. डोक्यावर तुळस, हरिनामाचा जयघोष, पांडूरंगाचे नामस्मरण, टाळमृदुंगाच्या गजरात भजन, अभंग, त्यानंतर ज्ञानोबा माऊली तुकाराम  असा जयघोष करत पाऊलीही रंगली.

त्यानंतर आरती होऊन पालखीने प्रस्थान केले. सुशोभित चित्ररथात पांडूरंगासह संत महात्म्यांच्या प्रतिमा आणि पादुकांचे मनमाडकरांनी दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार जगन्नाथ धात्रक, विजय नाईक, दत्तूभाऊ ताठे,  मधुकर पंडित, अशोक सानप, सुरेश बारसे आदींसह पालखी सोहळा समितीचे पदाधिकारी, परिसरांतील भजनी मंडळ, ग्रामस्थ आणि मनमाडकर नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Departure love pandharpur darshan palkhi ceremony gap two years ysh

Next Story
अकार्यक्षमता दूर न केल्यास मान्यता रद्दसाठी प्रस्ताव; मनपा शिक्षण विभागाचा शाळांना इशारा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी