नाशिक- शिवसेनेतून (उध्दव ठाकरे) एकेक नेता, पदाधिकारी, माजी आमदार, माजी नगरसेवक शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करत असताना ठाकरे गटाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे आणि राजाभाऊ वाजे यांनी जगणार तर शिवसेनेबरोबर आणि मरणार तर शिवसेनेसाठी,असा निर्धार नाशिक येथे बुधवारी आयोजित निर्धार शिबिरात व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय आणि विधानसभा निवडणुकीत मात्र दारूण पराभव या विरोधी निकालानंतर ठाकरे गटातर्फे बुधवारी नाशिक येथील गोविंदनगरातील मनोहर गार्डनमध्ये निर्धार शिबीर आयोजित करण्यात आले  आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाशिक शहरातील अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटात जाणाऱ्यांना रोखण्यासाठी या शिबिरातून प्रयत्न होण्याची शक्यता आहे. बुधवारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उत्साही घोषणांनी शिबिराला सुरुवात झाली. यानिमित्ताने परिसरात भगवेमय वातावरण करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या धक्क्यातून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते अजूनही बाहेर पडलेले नाहीत. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात विविध विषयांवर आंदोलन करण्याची संधी असतानाही ठाकरे गटात शांतता आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शिबिरातून नवी दिशा देण्याचे नियोजन या शिबिरातून केले जाणार आहे.

शिबिरातील प्रथम सत्रात आयोजित आम्ही इथेच या चर्चासत्रात अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे आणि राजाभाऊ वाजे यांनी सहभाग घेतला. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष करण्यात आला. शिवसेना दुभंगल्यानंतरही ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिलेल्या या नेत्यांनी या चर्चासत्रात एकवेळ राजकारण सोडून घरी बसणार, परंतु शिवसेना सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त करुन उपस्थितांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेसाठीच जगणार आणि शिवसेनेसाठीच मरणार, असेही त्यांनी नमूद केले. शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रात पुन्हा फडकाविण्याचा निर्धारही या नेत्यांनी व्यक्त केला.

शिबिरात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, ॲड. असीम सरोदे, खासदार राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे हेही मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराच्या समारोपात खासदार संजय राऊत आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.