नाशिक: भोंदू अशोक खरात प्रकरणातील बेनामी मालमत्ता, जमीन खरेदी अशा सर्व आर्थिक व्यवहारांची सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) दखल घेतली असून लवकरच चौकशीला सुरुवात होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे खरात प्रकरणाचा सीडीआर कुठून आला, त्याचाही तपास करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे अखिल भारतीय संत समितीची दोन दिवसीय बैठक झाली. बैठकीत रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अशोक खरात प्रकरणाचा एसआयटीकडून तपास सुरू असून त्यासंदर्भातील माहिती दररोज जाहीर करता येणार नाही. त्याची मालमत्ता आणि बँक खात्यातील व्यवहाराची सर्व माहिती एसआयटीकडे आहे. खरातने काही पतसंस्था आणि बँकांमधून कोट्यवधींचे व्यवहार केले असून, हे सर्व व्यवहार संशयास्पद आहेत. त्याच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. ईडीने या प्रकरणाची माहिती घेतली असून त्याची ईडीमार्फत चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
‘कठोर शिक्षेसाठी प्रयत्न’
अशोक खरातच्या गैरकृत्यात सहभागी असलेल्या कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अशोक खरातचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार शोधून काढण्यात येत आहेत. खरातची संपूर्ण संपत्ती, त्याचे सर्व गैरव्यवहार, त्याने महिलांशी केलेले गैरवर्तन, अशा सर्वांची सविस्तर चौकशी करून त्याला कठोरात कठोर शिक्षा कशी मिळेल, हे पाहण्यात येईल. राज्यातील सर्वांची अशीच भावना आहे. आमच्यासाठी तर कारवाई ही राजकारणाच्या पलीकडे आहे, परंतु काही लोक या प्रकरणावरूनही राजकारण करत आहेत.
अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याने केवळ महिलांचे लैंगिक शोषण केले असे नव्हे तर, अनेकांची जमीन वेगवेगळ्या प्रकारची भीती दाखवून अत्यंत कमी किमतीत मिळवल्याचेही उघड झाले आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मालमत्ता तसेच बँक खात्यांमधील कोट्यवधींच्या व्यवहारांची माहिती एसआयटीने मिळवली आहे. जगदंबा पतसंस्थेत ३२ तर समता पतसंस्थेत १०० खात्यांमध्ये खरातचे नाव वारसदार म्हणून आहे. या सर्व खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. खरात प्रकरणात आता ईडीकडूनही कारवाई होणार असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनीच दिल्याने या प्रकरणाचा तपास वेगाने होण्याची शक्यता आहे.
अंजली दमानियांकडे सीडीआर कुठून आला?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातचा सीडीआर जाहीर केल्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाजू मांडली. सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार सर्वांना नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनाच सीडीआर मिळविण्याचा अधिकार आहे. असे असताना या प्रकरणाचा सीडीआर कसा बाहेर आला, तो कुठून मिळवला, याची चौकशी केली जाईल.
कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची कामे
अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी, सिंहस्थ कुंभमेळा हा अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत असल्याची माहिती दिली. स्वच्छ गोदावरीत स्नान करता यावे म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचा प्रवाह बारमाही होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कुशावर्तासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मागील कुंभमेळ्यातील भाविकांच्या संख्येपेक्षा दहापट अधिक भाविक आले तरी त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
दमानियांकडे सीडीआर कोठून आला?
- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातचा सीडीआर जाहीर केल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडली. सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार सर्वांना नाही.
- या प्रकरणाचा तपास करणार्या यंत्रणांनाच सीडीआर मिळविण्याचा अधिकार आहे. असे असताना या प्रकरणाचा सीडीआर कसा बाहेर आला, तो कुठून मिळवला, याची चौकशी केली जाईल.
