नाशिक – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीवरुन भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यातील मतभेद उफाळून आले. याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेत तक्रारींचा पाढा वाचल्याचे सांगितले जाते. या घटनाक्रमावर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी महायुतीत तीनही पक्षात समन्वय असून कुठेही तणाव नसल्याचा दावा केला.

शहा यांच्याकडे राज्यातील भाजप नेत्यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचल्याचे सांगितले जाते. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याची तीव्र प्रतिक्रिया महायुतीमध्ये उमटली. शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पैसे देऊन फोडाफोडी केली जात असल्याची तक्रार केली. या घटनाक्रमाने महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले.

नाशिकमध्येही शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक अद्वय हिरे हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. या प्रवेशावरून शिंदे गटाचे मंत्री भुसे हे अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते.

नाशिक दौऱ्यावर असणारे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी या घटनाक्रमावर भाष्य केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. वरिष्ठ पातळीवरील हा विषय आहे. काही लोक इकडे तिकडे घेतल्याने काही झाले असेल, पण महायुतीत फार अशी टोकाची भूमिका नाही, असे महाजन यांनी सांगितले.

अद्वय हिरे यांच्या प्रवेशाचे त्यांनी समर्थन केले. हिरे हे उबाठामध्ये होते. शिवसेना शिंदे गटातून आम्ही घेतले असते तर वेगळी गोष्ट होती. आमचे ठरलेले आहे की, एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत. परंतु, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार अशा इतर पक्षातील लोकांना घेण्याची भूमिका आहे. त्याच पद्धतीने अद्वय हिरे यांना पक्षात प्रवेश दिला गेला.

भाजपने घेतले नसते तर शिवसेना शिंदे गट अथवा राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांना घेतले असते. त्यात काही वावगे नाही, असे त्यांनी नमूद केले. महायुतीत कुठेही वाद नाही. काही असेल तर वरिष्ठ लक्ष घालतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र बसून मार्ग निघेल. महायुतीतील तीनही पक्षात कुठलाही तणाव नसून समन्वय आहे, असा दावा देखील महाजन यांनी केला.