नाशिक – विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेने हात दिला. लाडक्या बहिणींनी भरभरुन मतांचे दान केल्याने महायुती विक्रमी यशाने विजयी झाली. परंतु, महायुती पुन्हा सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहिणींना देण्यात येणाऱ्या पैशांमुळे इतर योजनांसाठी पैसा देण्याकरिता सरकारची ओढाताण होऊ लागली.
लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी अनेक अटी-शर्ती लावण्यात आल्या. त्यांची चाळणी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यातच आली नगरपालिका, नगरपंचायतींची निवडणूक. या निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीचे नेते बाहेर पडले. आणि त्यांना पुन्हा लाडकी बहीण आठवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या विषयावर सूर एक झाला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे ठिकठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सोमवारी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सभा झाल्या. याआधीच्या आपल्या भाषणांमध्ये लाडकी बहीण योजनेचा सहसा उल्लेख न करणारे देवेंद्र फडणवीस आता प्रत्येक सभेत लाडक्या बहिणींचा उल्लेख करु लागले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणात निम्मा भर आपण लाडकी बहीण योजना कशी आली, त्यामुळे लाडक्या बहिणींना कसा फायदा झाला, लाडक्या बहिणींसाठी आपण काय काय करु इच्छितो, हे सांगण्यावर असतो. एकनाथ शिंदे यांच्या पिंपळनेर, मनमाड आणि सिन्नर येथे सभा झाल्या. या तीनही सभांमध्ये लाडक्या बहिणी हा विषय समान धागा राहिला.
धुळे : मी मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री, माझी ओळख कार्यकर्ता अशीच असली तरी माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेले लाडका भाऊ, हे माझे सर्वात मोठे पद आहे. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. ज्याच्यामागे लाडक्या बहिणींची शक्ती आहे. त्याचा विजय कोणीही रोखू शकत नाही. लाडक्या बहिणींनीच विधानसभेत जादू केली.
आमदार मंजुळाताई या माझ्या लाडकी बहीण आहेत. तुमचा भाऊ म्हणून मी या लाडक्या बहिणींमागे उभा आहे, असे आवाहन शिंदे यांनी पिंपळनेर येथील सभेत केले होते. मनमाड आणि सिन्नर येथील सभेतही लाडक्या बहिणींवरच त्यांचा भर राहिला. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीतही लाडक्या बहिणी साथ देतील, अशी त्यांना आशा आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री फडणवीसही आता आपल्या भाषणात लाडक्या बहिणींना स्थान देऊ लागले आहेत. भुसावळ, त्र्यंबकेश्वर येथील जाहीर सभांमध्ये फडणवीस यांनी लाडक्या बहिणींचा विषय काढला. शिंदे आणि फडणवीस दोघांच्या जाहीर सभांमधील एक मुद्दा समान आहे. एकनाथ शिंदे म्हणतात, जोपर्यत हा एकनाथ शिंदे तुमच्यामागे लाडका भाऊ म्हणून आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही.
दुसरीकडे, फडणवीस म्हणतात, जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. ती अजिबात बंद पडणार नाही. शिंदे, फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना ग्वाही दिली असली तरी केवायसीमुळे लाडक्या बहिणींमध्ये अस्वस्थता आहे.
