नाशिक – पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नाशिक येथील श्री स्वामी नारायण मंदिर सभागृहात पार पडली. भारतातील २६ राज्यांमधून संत-महंत सहभागी झाले होते. या बैठकीत सिंहस्थाची तयारी, सनातन धर्म वाढाविण्यासाठी करावयाचे उपाय, धर्मावरील आक्रमण अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
परंतु, त्यातही विशेष महत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले गेले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठकीचा समारोप झाला. यावेळी उपस्थित अनेक संत, महंतांनी मुक्तकंठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली. हिंदू सनातन धर्मासाठी त्यांच्याकडून होत असलेल्या प्रयत्नांचे गुणगान केले.
अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीस अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष अविचल देवाचार्य, जितेंद्रानंद स्वामी, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी महाराज, तुषार भोसले, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महंत ग्यान देवसिंग महाराज, संत निवृत्ती महाराज, रावसाहेब महाराज गोसावी, पुरुषोत्तम महाराज देहूकर, अशोक तिवारी, यतिंद्रानंद गिरीजी महाराज, जनार्दनहरी महाराज, स्वामी संविदानंद सरस्वती, ब्रह्मेशनंद महाराज, राजेंद्र दास, महंत दुर्गादास महाराज, भक्तिचरणदास महाराज आदी उपस्थित होते.
कुंभमेळ्याच्या तयारीबाबत समाधान व्यक्त करीत कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थितांनी दिले. बैठकीच्या समारोपाला उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, नाशिकआणि त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा भव्य दिव्य आणि अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत असल्याचे सांगितले. साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहणाचा निर्णय घेण्यात आला आहे. साधूग्राममध्ये आवश्यक सर्व पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी संत शक्तीचे महत्व मांडले.
बैठकीत सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहिले. उपस्थित साधू, संतांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. जितेंद्रानं स्वामी यांनी, हिंदू हिताचे रक्षण करणाऱ्या नेतृत्वामुळेच धर्माला नवी दिशा मिळत असल्याचे सांगत फडणवीस यांच्या नेतृत्वगुणाविषयी समाधान व्यक्त केले. स्वामी यतिंद्रानंद गिरीजी महाराज यांनी, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात धर्माभिमानी मुख्यमंत्री असल्याने सनातन धर्माला ताकद मिळाली असल्याचे सांगितले.
भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनीही आपल्या नेत्याचे गुणगान गायिले. देवेंद्र फडणवीस यांनी मस्लिमांचे आरक्षण रद्द करणे, निर्मल वारीचे नियोजन करणे, अशी कामे केली आहेत. फडणवीस यांना हनुमान चालिसा, बुध्द वंदना आणि सर्व मंत्र मुखोदगत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही प्रमुख संत, महंतांचा सन्मान केला. मंचावरुन खाली उतरत उपस्थितांना नमस्कार केला. त्यामुळे उपस्थित साधू, महंत चांगलेच प्रभावित झाले
