नाशिक : पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर अखिल भारतीय संत समितीच्या वतीने नाशिकच्या पंचवटीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय परिषदेत देशभरातील प्रमुख साधू, महंत उपस्थित आहेत. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत साधू, महंतांकडून ज्या काही सूचना करण्यात येतील, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार म्हणून आम्ही कटिबध्द आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मजेशीर स्वभावाचाही अनुभव उपस्थित साधू, महंतांना आला.

अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेत पहिल्या दिवशी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात “नशामुक्त कुंभ” ही संकल्पना राबविण्याचा निर्धार साधू, महंतांनी व्यक्त केला होता. कुंभमेळा हा देशभरासाठी आदर्श ठरावा आणि युवाशक्तीला योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने हा संकल्प करण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. कुंभमेळा अधिक भव्य दिव्य करण्याच्या प्रयत्नात अनावश्यक खर्च टाळावा, असे मतही त्यांनी मांडले. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा मांडला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा आणि वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी संत-महंतांनी विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना अनेक गोष्टींचा उहापोह केला. कुंभमेळा यशस्वी करण्यसाठी शासनातर्फे कोणकोणती कामे करण्यात येत आहेत, कशा प्रकारे प्रयत्न होत आहेत, याविषयी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात प्रथमच कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण आपल्या सरकारने स्थापन केले. त्याशिवाय कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्यामुळे, “कुंभमेळ्याच्या तयारीत एखादी गोष्ट राहून गेल्यास पहिली शिवी गिरीश महाजन यांना आणि त्यानंतर दुसरी शिवी मला मिळेल,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगताच उपस्थित साधू, महंतांना हसू आवरता आले नाही.

सरकारकडून कितीही कामे करण्यात आली, तरी अशा भव्य कुंभपर्वात एखादी गोष्ट करावयाची राहून जाते. ती गोष्ट लक्षात येते, तेव्हां ती पूर्ण करण्याची वेळ निघून गेलेली असते. कधी कधी कुंभमेळा संपल्यानंतर अमूक एक राहून गेल्याचे लक्षात येते. त्यामुळे प्रत्येक कुंभमेळा काही ना कोही शिकवून जातो. मागील कुंभमेळ्यात राहून गेलेली गोष्ट पुढील कुंभमेळ्यात केली जाते. कुंभमेळा आयोजनाचा उत्साह असला तरी चिंताही असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. साधू, महंतांकडून सरकारला कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.