नाशिक – विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन आणि मराठी भाषा दिना निमित्ताने पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कांदा उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याचे संकट थोडक्यात टळले. याची माहिती खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात दिली.
काही लोकांनी गाडी अडविण्याचे ठरवले होते. आपली गाडी पुढे निघून गेली. त्यांचा कार्यक्रम काही होऊ शकला नाही. परंतु, कांद्याचा प्रश्न महत्वाचा असून त्यावर लवकरच बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
राज्य शासनाच्या वतीने आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या कुसुमाग्रज साहित्य नगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह छगन भुजबळ, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यात साहित्य भूषण पुरस्काराने डॉ. भालचंद्र नेमाडे तर, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने श्रीनिवास कुलकर्णी, विश्व मराठी संंमेलन विशेष पुरस्काराने शांतिब्रह्म मारूतीबाबा कुरेकर यांना सन्मानित करण्यात आले. विश्व मराठी संमेलनात कांदा प्रश्न ऐरणीवर आला. कांद्याचे भाव एक हजार रुपयांपेक्षा खाली गेल्यामुळे ग्रामीण भागात आंदोलनाचे सत्र सुरू आहे. या आंदोलनाचे लोण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडवण्यापर्यंत पोहोचणार होते. त्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच आपल्या भाषणात दिली.
संमेलनातील भाषण पूर्ण होत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाता जाता त्यावर भाष्य केले. नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न आहे. काही लोकांनी गाडी अडविण्याचे ठरवले होते. दुदैवाने माझी गाडी निघून गेली. तुमचा कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची क्षमा मागतो, तुम्ही गाडी अडवू शकले नाहीत, तरी तुमचा प्रश्न महत्वाचा आहे. नाशिकचे मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे व गिरीश महाजन यांनीही कांदा प्रश्नावर बैठक घ्यावी म्हणून पत्र दिले आहे.
आपली गाडी अडवली नसली तरी दरवर्षी आपण कांदा प्रश्नावर जसा तोडगा काढतो, तसाच तोडगा काढून उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. वैश्विक बाजारामुळे दरवर्षी काहीतरी अडचण कांदा उत्पादकावर येते. युतीचे सरकार आल्यापासून अशा अडचणीत आपण उत्पादकांच्या पाठिशी उभे राहतो, तसेच उत्पादकांच्या पाठिशी सरकार उभे राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
