नाशिक – धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. संबंधितांवर कारवाईची मागणी होत असताना बागेश्वर बाबा यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्या विधानाला लोककथांचा संदर्भ दिला आणि इतिहासात तसा कुठलाही दाखला नसल्याचे नमूद केले. बागेश्वर बाबांनी ‘चार मुले जन्माला घालून त्यातील एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघात द्यावा’ या केलेल्या आवाहनाचा अर्थ देखील फडणवीस यांनी विषद केला.

​जल व्यवस्थापन कृती पंधरवडा उपक्रमांतर्गत जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ जलयात्रेला शनिवारी गोदावरीचे उगमस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरुवात झाली. त्र्यंबकेश्वर येथे या कार्यक्रमासाठी दाखल झालेल्या फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

​धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांनी युद्धात थकवा जाणवल्यानंतर समर्थ रामदास स्वामींच्या चरणी मुकुट ठेवला आणि राज्यकारभार सोपवण्याची विनंती केली, अशी कथा सांगितली. पुढे रामदास स्वामींनी त्यांना पुन्हा राज्यकारभाराची जबाबदारी दिली, असे त्यांनी म्हटले होते. यावरून विरोधकांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानावर फडणवीस यांनी इतिहासात अशा प्रकारचा कुठलाही दाखला पाहायला मिळत नसल्याचे नमूद केले. महापुरुषांविषयी अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या लोककथा असतात. रामायण, महाभारताशी संबंधित अनेक लोककथा आहेत. आपण जो इतिहास शिकलो त्यात आणि उपलब्ध ग्रंथांत असा कुठलाही दाखला नाही, असे फडणवीस यांनी नमूद केले.

​संघाबाबतच्या विधानावर स्पष्टीकरण

​धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी चार मुले जन्माला घाला, त्यातील एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या असे आवाहन केले होते. यावरून उपस्थित झालेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधू-संत त्यांची मते मांडतात, त्यांचा उद्देश योग्य संदर्भाने घेतला पाहिजे,असे सांगितले. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशी संघटना आहे की जिने हिंदू संस्कृती, सनातन संस्कृतीला जिवंत ठेवले, नवचैतन्य दिले आहे. त्यामुळे आपल्या घरचा एक मुलगा संघात असावा असे त्यांचे म्हणणे असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.