नाशिक – मविप्र शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील कविवर्य कुसुमाग्रज नगरीत आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी मुंबई ते नाशिक हा प्रवास वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या लिअर जेट विमानातून केल्याचे सांगितले जाते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून ‘व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी आणि त्यांची लिअर जेट-४५ विमाने चर्चेत आहेत. या अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीएने या कंपनीची चार विमाने ग्राऊंड करण्याचे आदेश दिले होते.
पथकाला पडताळणीत सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यानंतर कारवाई झाली होती. सुरक्षेचे निकष पूर्ण होत नाही, तोपर्यंत ठराविक नोंदणी असणाऱ्या विमानांच्या उड्डाणास प्रतिबंध करण्यात आला होता. दुसरीकडे आमदार रोहित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सर्वंकष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहेत. या प्रकरणात संबंधित कंपनी आणि डीजीसीएविरुद्ध कारवाईसाठी ते आग्रही आहेत.
डीजीसीए विरुद्ध त्यांनी पोलिसांत तक्रारही देण्याचा प्रयत्न केला होता. ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीसह त्यांच्या लिअरजेट विमानांविषयी विविध पातळीवर चर्चा होत असताना शुक्रवारी नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याच कंपनीच्या लिअरजेट प्रकारातील विमानाचा वापर केल्याचे सांगितले जाते. त्यास एका शासकीय अधिकाऱ्याने दुजोरा दिला.
राज्य शासनाच्या वतीने के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या कुसुमाग्रज साहित्य नगरीत चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री भुजबळ व महाजन यांनी मुंबईहून नाशिकला येताना या एकाच विमानाने प्रवास केला.
दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी आमदार ॲड. राहुल ढिकले, सरोज अहिरे, महापौर हिमगौरी आडके, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी अधिकारी उपस्थित होते.
ओझर विमानतळावर मान्यवरांना घेऊन आलेले हे विमान ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीचे आहे. विमानतळावरील छायाचित्रात विमानावर कंपनीच्या नावाचा ‘व्हिएसआर’ असे लघुरूपातील उल्लेख दृष्टीपथास पडतो. हे विमानदेखील लिअरजेट प्रकारातील असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
