नाशिक – कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आव्हानांसह निर्माण झालेल्या संधींचा वापर करून जागतिक पातळीवर मराठी साहित्य नेण्याचे कार्य मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.. नव्या पिढीत मराठीतील संवाद कौशल्य विकसीत करण्यासाठी ‘लँग्वेज लॅब ‘ कार्यान्वित करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

येथील मराठा विद्या प्रसारक समजा संस्थेच्या आवारात उभारण्यात आलेल्या कविवर्य कुसुमाग्रज नगरीत चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, संमेलनाचे निमंत्रक तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ , महापौर हिमगौरी आडके यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, भालचंद्र नेमाडे, ॲड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विश्व मराठी संमेलनासाठी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, नॉर्वेसह जगातील विविध देशातून मराठी बांधव नाशिक नगरीमध्ये दाखल झाले आहेत. जगभरातील मराठी माणूस मराठी भाषा आणि महाराष्ट्राचे तेथील सदिच्छा दूत आहेत. त्यांच्या माध्यमातून महाराष्टाची संस्कृती आणि वैभव जगभरात पोहोचते. मराठी भाषेत सर्वाधिक साहित्य तयार होते. देशात सर्वात समृद्ध रंगभूमी मराठी मुलुखात आहे. इथे नवनवीन नाट्याची निर्मिंती होते आणि त्याला प्रतिसाद देणारे रसिकही आहेत. साहित्य, नाट्य आणि लोकगितांची आवड या भूमीला आहे आणि त्याची जपणूक मराठीने केली आहे.

मराठी भाषेमुळे तयार झालेल्या लोकपरंपरांमुळे आपले जीवन समृद्ध झाले आहे. कितीही आव्हाने निर्माण झाली, तरी अभिजात साहित्याला आव्हान मिळू शकत नाही. भाषेचा अभिमान बाळगण्याबरोबर ती ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा होणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी विभाग चांगले प्रयत्न करीत आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.

परकीय आक्रमकांनी आपल्यावर राज्य केल्याने आपल्या राज्य कारभारात फारसी, अरबी शब्द होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रमाण भाषेचा कोष तयार केला. आधुनिक महाराष्ट्रात भाषा शुद्धीकरणाचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले. त्यांनी मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले, असे फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी, नाशिक येथे मराठी भाषेचा कुंभमेळा विश्व मराठी संमेलनानिमित्त भरल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते संत निवृत्तीनाथ महाराज विश्वस्त मंडळाला ५० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

लंडनमध्ये मराठी भाषा वैश्विक केंद्र

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी, मुंबईतील मराठी भाषा भवनाचे काम सुरू असून त्याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढील वर्षी २७ फेब्रुवारीला होईल, असे सांगितले. मराठी भाषेला जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी लंडन येथे राज्य शासनाने मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती येत्या तीन महिन्यात स्थापन करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून साहित्य प्रकाशनासाठी मदत केली जाईल. संत वाड्मय मराठी भाषेचा पाया असून संत वाङ्मयाच्या प्रचार व प्रसारासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.