नाशिकपासून अवघ्या ३० ते ३५ किमी अंतरावर असलेलं त्र्यंबकेश्वर हे देवस्थान बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक मानलं जातं. या ठिकाणी असलेल्या कुशावर्त या तलावात अंघोळ केल्यास पापक्षालन होतं अशीही भाविकांची श्रद्धा आहे. याच मंदिराला मोठा इतिहासही आहे. तसंच मंदिराबाबतच्या अख्यायिकाही आहेत. याच त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांशी सुरक्षारक्षकांनी मुजोरी केल्याचा आरोप होतो आहे. एक कुटुंब या ठिकाणी दर्शनाला गेलं होतं. त्यांना या ठिकाणी चांगली वागणूक मिळाली नाही. उलट शिवीगाळ, मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली असा आरोप होतो आहे. सूर्यवंशी कुटुंबाने हा आरोप केला आहे. आपण जाणून घेऊ हे प्रकरण काय?

सूर्यवंशी कुटुंबाचं म्हणणं नेमकं काय?

“आम्ही चारजण मंदिरात गेलो होतो. मी चारधाम करुन आले म्हणून आम्ही सगळे या मंदिरात गेलो होतो. मंदिरातल्या तिथल्या एका दादांना (सुरक्षारक्षक) आम्ही सांगितलं आम्हाला तीर्थ हवं आहे एका बाटलीत भरुन द्या. त्यांनी यावर नाही असं उत्तर दिलं. त्यानंतर आम्ही बाटली परत घेतली. म्हटलं चला नमस्कार करतो. नमस्कार करायला माझा मुलगा खाली वाकला आणि सुरक्षारक्षकांनी धक्का दिला. दोन सेकंदांत ढकलण्यात आली. आमचं दर्शनही नीट झालं नाही. मी माझ्या नातवाच्या मागेच होते. मला तेव्हा कुणी ढकललं काही दिसलंच नाही. मी खाली पडले तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला पाठीमागून जोरात धक्का दिला. त्यामुळे माझ्या डोक्याला बराच मार लागला. उजव्या बाजूलाही दुखतं आहे. असं सूर्यवंशी काकू यांनी सांगितलं. “

हे पण वाचा- त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे प्रमाणपत्र, अंनिसचा आक्षेप; दुकानदारांची नाराजी

या घटनेबाबत मंदिरात गेलेल्या सूर्यवंशी काकांनी काय सांगितलं?

“मी त्या सुरक्षारक्षकांना इतकंच सांगत होतो की तु्म्ही अरेरावी करु नका आणि शिव्या देऊ नका. मंदिरातच त्यांनी आम्हाला शिवी दिली. त्यानंतर त्यांना मी हे म्हणालो. त्यानंतर आम्हाला बाहेर बोलवलं तीन ते चार गार्ड्सनी माझ्या मुलाला मारहाण केली. मी त्यांना सांगत होतो की असं वागू नका. माझी पत्नी पडली होती खाली. नातू रडायला लागला होता. इतर भाविकांनाही सांगत होतो की सगळे त्रास देत होते. माझ्या मुलाला म्हणजेच महेंद्रला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली.”

महेंद्र सूर्यवंशींचा आरोप काय?

“सुरक्षा रक्षक माझ्याशी मुजोरी करत होते. मला म्हणाले हे मंदिर तुझ्या बापाचं आहे का? त्यावर मी म्हटलं ही भाषा नाही. पण बाचाबाची सुरु झाली होती. त्यानंतर त्यांनी मला मारहाण झाली. सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणी तपासलं पाहिजे. पोलीस ठाण्यात गेलो तेव्हा भलतेच लोक समोर आले होते. माझा एकच सवाल आहे की सुरक्षा रक्षकांना भाविकांना मारण्याचे हक्क कुणी दिले? भाविक मार खायला येतात की आशीर्वाद घ्यायला येतात?” असा प्रश्न महेंद्र सूर्यवंशी यांनी विचारला आहे. झी २४ तास या वाहिनीशी बोलताना सूर्यवंशी कुटुंबाने हे आरोप केले आहेत.

पोलीस आणि मंदिर प्रशासनाने काय म्हटलं आहे?

सदर घटना रविवारी सकाळी ११ च्या दरम्यान घडली आहे असं पोलिसांनी या प्रकरणी सांगितलं आहे. तसंच सूर्यवंशी कुटुंबाची तक्रार आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मंदिर प्रशासनाने याबाबत काहीही म्हणणं मांडलेलं नाही. आमच्याकडे तक्रार केलेली नाही ते कुटुंब पोलिसांकडे गेलं इतकंच मंदिर प्रशासनाने म्हटलंय.