जळगाव : जिल्ह्यातील हजारो भाविक दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीला पंढरपूर वारी करतात. एरवी भाविक अधुनमधून पंढरपूर जातच असतात. या पार्श्वभूमीवर, भुसावळहून खास पंढरपुरसाठी यात्रेच्या काळात विशेष रेल्वे चालविल्या जातात. या गाड्या कायम स्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी आता पुढे आली आहे. पांडुरंगाच्या दर्शनाची आस असणाऱ्या वारकऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.

सणांच्या काळात तसेच आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरकडे प्रस्थान करतात. या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेकडून दरवर्षी खास पंढरपुरसाठी ८० हून अधिक विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक, भुसावळ यासह राज्यातील प्रमुख शहरांमधून या विशेष गाड्या धावतात. मात्र, या गाड्या केवळ यात्रेच्या कालावधी पुरत्याच धावतात. पंढरपुरसाठी कायमस्वरूपी नियमित एक्स्प्रेस सेवा नसल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होत असते. जळगाव जिल्ह्यातूनही दरवर्षी हजारो भाविक विशेषतः आषाढी एकादशीला पंढरपूर वारीसाठी निघतात. पैकी अनेक वारकरी पायी वारी करत असले, तरी मोठ्या संख्येने भाविक रेल्वेनेही पंढरपूर प्रवास करतात. आषाढी–कार्तिकी व्यतिरिक्त वर्षभरातही अधूनमधून पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरला जातात.

लोकप्रतिनिधींकडून पाठपुराव्याची अपेक्षा

भुसावळहून थेट आणि नियमित रेल्वे सेवा नसल्याने प्रवाशांना वाटेत अनेक गाड्या बदल्याव्या लागतात. प्रसंगी लांबचा प्रवास आणि गर्दीचा सामना करावा लागतो. या अनुषंगाने भुसावळहून पंढरपुरसाठी यात्रेच्या काळात चालविण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या कायमस्वरूपी सुरू ठेवाव्यात, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. भुसावळ हे महत्त्वाचे जंक्शन असून जळगाव, धुळे, नंदुरबारसह खान्देशातील भाविकांसाठी ते प्रमुख रेल्वे केंद्र आहे. येथून थेट पंढरपूरपर्यंत नियमित एक्स्प्रेस सुरू झाल्यास वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरेल, असा भाविकांचा सूर आहे. या संदर्भात नागरिक, वारकरी संघटनांकडून रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने निवेदने देण्यात येत असून, लोकप्रतिनिधींनी या मागणीचा पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

भुसावळ–मिरज गाडीला प्रतिसाद

रेल्वे प्रशासनाकडून अद्याप भुसावळ–पंढरपूर गाडीच्या मागणीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी भाविकांना सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. आगामी काळात भुसावळ–पंढरपूर नियमित एक्स्प्रेस सुरू होणार का, याकडे संपूर्ण वारकरी संप्रदायाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, गर्दीच्या काळात होणारी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नुकतीच भुसावळ–मिरज ही विशेष गाडी चालविली. भुसावळसह जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथे थांबा असलेल्या या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला. त्यामुळे भुसावळ–पंढरपूर विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.