धन्वंतरी पूजनातून आरोग्य संवर्धनाचा संदेश ; ठिकठिकाणी दिव्यांची रोषणाई

धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर महाराज, धन्वंतरी तसेच महालक्ष्मी देवीचे विधीवत पूजन करण्यात आले.

नाशिक येथे धन्वंतरी पूजनप्रसंगी महापालिका आयुक्त कैलास जाधव, वैद्य विक्रांत जाधव व वैद्य नीलिमा जाधव.

पणत्यांची आरास, बाजारपेठेतील गर्दी कायम

नाशिक : प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी धनत्रयोदशीनिमित्त कुबेर महाराज, धन्वंतरी तसेच महालक्ष्मीची पूजा करण्यात आली. महागाईची पर्वा न करता आकर्षक रोषणाई, पणत्यांची आरास, आकाशकंदील यांच्या माध्यमातून दीपोत्सवाचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. या दिवशी ठिकठिकाणी धन्वंतरीचेही पूजन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठांमध्ये असलेली गर्दी कायम आहे.

तिमीरातून तेजाकडे जाण्याचा संदेश देणारा दीपोत्सवास आपल्याकडे विशेष महत्व आहे. या निमित्ताने घर, दुकाने यासह इमारत परिसर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आकाश कंदिलमध्ये कोणाचा कंदिल मोठा अशी अहमिका लागली. रंगीत रांगोळीने अंगण सजले. धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर महाराज, धन्वंतरी तसेच महालक्ष्मी देवीचे विधीवत पूजन करण्यात आले.

येथील सुशिला आयुर्वेद चिकित्सालयाच्या वतीने धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते आरती करण्यात आली. करोना काळात उपयुक्त ठरलेल्या आयुर्वेदिक वनस्पतीची आरास करण्यात आली होती. यामध्ये तुळस, आलं, लसून, गुळवेल यासह वेगवेगळय़ा औषधी वनस्पतीचा समावेश होता.  अष्टांग आयुर्वेद येथेही नागरिकांच्या आरोग्यासाठी होम हवन करण्यात आले.

लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेच्या स्वागतासाठी व्यापारी वर्ग सज्ज झाला आहे. खतावण्या, चोपडय़ा यांना व्यापारी लक्ष्मी म्हणून पूजत असल्याने लक्ष्मीपूजनाचे महत्व त्यांच्यासाठी अनन्यसाधारण आहे. घराघरांमध्ये केरसुणीला लक्ष्मीच्या स्वरूपात पूजले जाते.

केरसुणी, पणत्या, लक्ष्मीची पाऊले, लक्ष्मी मूर्ती, लाह्या बत्तासे , बोळकी यासह अन्य पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग दिसून आली.  खरेदीसाठी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त चांगला मानला जात असल्याने सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दुकाने, वाहन दुकानांमध्ये मोठय़ा प्रमाणात आगावू नोंदणी होत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलतींचा वर्षांव केला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dhanteras 2021 diwali festival 2021 dhanvantari pujan message for promotion of health