जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव येथे एका खासगी माध्यमिक शाळेच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचे सतत तीन वर्षे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयिताविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

राहुल जगन्नाथ अहिरे (३२, रा. अमळनेर, जि. जळगाव), असे अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनी धरणगाव शहरातील एका खासगी माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत असताना शिक्षक राहुल अहिरे याने तिच्याशी गोड बोलून मैत्री केली.

त्यानंतर वेळोवेळी धरणगाव तसेच अमळनेर येथे तिचे लैंगिक शोषण केले. तसेच विद्यार्थिनीसोबत काही आक्षेपार्ह छायाचित्रे काढली. सदर छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तो २०२२ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत पीडित विद्यार्थिनीकडे वारंवार शरीर संबंधाची मागणी करुन अत्याचार करत होता.

शिक्षकाकडून सुरु असलेला शारीरिक आणि मानसिक छळ पीडित विद्यार्थिनीला असह्य झाला होता. त्याच्याकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रस्त झाल्यानंतर अखेर तिने धाडस करून आपल्या आई-वडिलांना तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यामुळे संतप्त झालेल्या पीडितेच्या नातेवाईकांनी धरणगावमध्ये शिक्षकाला गाठून चोप दिला.

पीडित विद्यार्थिनीच्या आईने धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयित शिक्षक राहुल अहिरे याच्याविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष पवार पुढील तपास करत आहे.

विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल

दुसऱ्या एका घटनेत शाळेत आणि खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या दोन टवाळखोरांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थिनी गेल्या दोन महिन्यांपासून वरखेडी नाका ते भारत डेअरी बसथांबा या दरम्यान शिकवणी किंवा शाळेत जात असताना, संशयित गणेश संजय महाजन आणि गोलू बापू महाजन (दोघे रा. वरखेडी नाका, पाचोरा) हे दोघे तिचा पाठलाग करत असत.

दोन्ही संशयित तिच्याकडे एकटक बघून अश्लील हावभाव करत असते. तसेच मोठ्या आवाजात गाणी म्हणून शिट्ट्या वाजवून तिला त्रास देत होते. हा प्रकार सहन न झाल्याने पीडित मुलीने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.