नाशिक – धीरेंद्रकृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबा यांचा दोन मे रोजी शहराजवळील गोवर्धन शिवारात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चमत्काराचे दावे करुन अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या तसेच महाराष्ट्रातील संत व महापुरुषांविषयी वारंवार अपशब्द वापरणाऱ्या या बाबाचा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच त्यांनी चमत्कार सिध्द केल्यास २१ लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येईल, असे आव्हान धीरेंद्र शास्त्री यांना दिले आहे.

धीरेंद्र शास्री हे धार्मिक कथा प्रवचनाच्या नावाने महाराष्ट्रात येतात. आणि संत तुकाराम तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरून त्यांचा वारंवार अपमान करतात. हा केवळ या महापुरुषांचा, संतांचा अपमान नसून तो संपूर्ण महाराष्ट्रीयन जनतेचा अपमान आहे. ते व्यक्तीच्या मनातील प्रश्न ओळखण्याचा आणि त्यांचे दैवी उत्तर देण्याचाही दावा करतात. अशा प्रकारचा चमत्कारिक दावा करणे, हे भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांशी पूर्णतः विसंगत आहे. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आहे. त्याचे ते उल्लंघन करतात, असे महाराष्ट्र अंनिसने म्हटले आहे.

अंनिसचे आव्हान…

दैवी चमत्कारिक दावे धीरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अटी- शर्ती,नियम पाळून कोणत्याही शासकीय इमारतीच्या खोलीमध्ये त्या विषयांचे तज्ज्ञ, शासकीय अधिकारी, पोलीस, पत्रकार आणि त्यांचे व संघटनेचे मोजके पदाधिकारी यांच्या समक्ष आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर सिद्ध करावेत. अंनिसने दिलेल्या १० व्यक्तींच्या मनातील प्रश्न ओळखावेत, त्यांचे नाव , गाव व पत्ता सांगावा.असे त्यांनी करून दाखविल्यास चमत्कार सिद्धीसाठी महाराष्ट्र अंनिसचे २१ लाखांचे पारितोषिक त्यांना मिळेल. चमत्काराचे दावे सार्वजनिक ठिकाणी येऊन सिद्ध करण्याचा आग्रह ते धरतात. ही त्यांनी शोधलेली पळवाट आहे. शिवाय महाराष्ट्र अंनिसबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे अंनिसने म्हटले आहे.

कार्यक्रम रद्द करण्याची मागणी

अंधश्रद्धांना खतपाली घालणाऱ्या, भारतीय संविधानाच्या मूल्यांशी विसंगत वर्तन करणाऱ्या आणि महापुरुषांच्या आणि संतांच्या बद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या धीरेंद्रकृष्ण शास्त्रीचा नाशिकमध्ये होणारा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी अंनिसने केली आहे. कार्यक्रम रद्द न झाल्यास अंनिस समविचारी संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.