ढोल-ताशा पथक अजूनही परवानगीच्या आशेवर

गणेशोत्सव म्हटला की ढोल-ताशांचा दणदणाट हे समीकरण नित्याचे आहे

पोलीस आयुक्त सकारात्मक, येत्या दोन दिवसांत निर्णय होणार

नाशिक : गणेशोत्सव म्हटला की ढोल-ताशांचा दणदणाट हे समीकरण नित्याचे आहे; परंतु करोनामुळे उत्सवावर निर्बंध आहेत. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका उत्सवाच्या उत्साहाला बसला आहे. सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव मिरवणुकीवर निर्बंध लादल्याने उत्सवप्रेमींचा हिरमोड झाला आहे. ढोल-ताशा पथकाचा दणदणाट यंदाही होणार की नाही, याविषयी दोन दिवसांत निर्णय होणार आहे.

मुंबई, पुणेपाठोपाठ आता नाशिकमध्ये मोठय़ा प्रमाणावर ढोल-ताशा संस्कृती रुजत आहे. जिल्ह्य़ात ४३ पथके  असून शहर परिसरात २७ पथके  आहेत. एका पथकात १०० हून अधिक उत्सवप्रेमी सहभागी असतात. ढोल, ताशा, झांज, शंख अशी विविध वाद्ये वाजविणारी मंडळी सहभागी होतात. जिल्ह्य़ात साधारणत: चार हजाराहून अधिक मंडळी याद्वारे सहभागी आहेत. मागील वर्षी करोनामुळे सार्वजनिक मिरवणुकांवर बंदी असल्याने उत्सवाला मर्यादा आल्या होत्या.

यंदाही तशीच परिस्थिती आहे. उत्सव हा उत्सवासारखा व्हावा, यासाठी ढोल-ताशा पथक पुढाकार घेण्यासाठी इच्छुक आहेत. ढोलवादन कोणाच्या उपजीविके चे साधन नाही. या पथकांना कु ठलेही राजकीय पाठबळ नाही. वेगवेगळ्या सामाजिक उपक्र मांत पथक पोलीस तसेच प्रशासनाला सहकार्याच्या भूमिके त राहते. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवावर लादलेले निर्बंध पाहता गणेश स्थापना आणि विसर्जनावेळी मिरवणूक न काढता जागेवर २५ ते ३० वादकांच्या साथीने स्थिर ढोलवादनाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

करोना नियमांचे पालन करत हे वादन होईल, अशी ग्वाही पथके  देत आहेत. या संदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.  दरम्यान, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याशी ढोल पथकातील वादकांनी चर्चा के ली. ढोलवादन थांबल्यामुळे वादकांमध्ये नैराश्य आले असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. पोलीस आयुक्तांनी याबाबत प्रशासनाशी चर्चा करून पुढील दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल. परंतु त्याआधी मंडळांनी नोंदणी करावी, अशी सूचना पाण्डेय यांनी के ली.

हा आमचा आनंदाचा ठेवा

ढोल पथक आमच्या उपजीविके चे साधन नाही. पथकातील काही व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनीयर, विद्यार्थी आहेत. वेगवेगळी जबाबदारी लीलया पेलत आहेत. कामाचा ताण हलका करणारे ढोल पथक आमच्यासाठी आनंदाचा ठेवा आहे. सर्वाना एकत्रित येण्याचे माध्यम आहे. दोन वर्षांपासून उत्सव हे अत्यंत साधेपणाने साजरे होत आहेत. उत्सव उत्सवासारखा वाटावा यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ढोलवादनातून एक चैतन्य निर्माण होते. ती ऊर्जा सर्वांपर्यंत पोहोचते. आज करोनाकाळात ही ऊर्जा गरजेची आहे.

– अनिरुद्ध भूधर (तालरूद्र पथक)

पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आयुक्त याबाबत सकारात्मक असून पुढील दोन दिवसांत याविषयी चित्र स्पष्ट होईल. मात्र ढोल-ताशा पथकांची नोंदणी करा ही सूचना स्वागतार्ह आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने नोंदणी होत आहे. लवकरच राज्यात अन्य ठिकाणीही नोंदणी सुरू होईल.

– सर्जेराव वाघ (माऊली प्रतिष्ठान)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dhol tasha squad is still hoping for permission ssh

ताज्या बातम्या