धुळे : शहरातील युनिटी सर्कल परिसरातील झोपडपट्टी भागात शनिवारी सायंकाळी झालेल्या मिसफायरिंगच्या घटनेमुळे काही काळ परिसरात घबराट पसरली. चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सुमारे ५० वर्षीय महिला किरकोळ जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला घराजवळ पाणी पित असताना अचानक सुटलेली गोळी त्यांच्या उजव्या मनगटाजवळून स्पर्श करत पुढे गेली. त्यामुळे त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. ही गोळी पुढे जाऊन जवळील एका घराच्या पत्र्याला लागल्याचेही तपासात समोर आले आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच गोळीबाराचा नेमका स्रोत आणि परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी परिसरातील घरे, टेरेस तसेच आसपासच्या भागाची सखोल तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान ज्या घराला गोळी लागली त्या घरासमोरच फायरिंगच्या दिशेत एक गन लायसन्स असलेले दुकान व निवासस्थान असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणाची तपासणी सुरू केली.

प्राथमिक तपासात संबंधित दुकानातूनच गोळी मिसफायर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. सुटलेला राउंड आकाराने लहान असून त्या प्रकारचे राउंडही त्या दुकानात उपलब्ध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, पुढील तपासात ही घटना गन साफ करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे उघड झाले. जुबेर मेहमूद पठाण हा व्यक्ती गन साफ करत असताना चुकून मिसफायर झाल्याची बाब समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय संबंधित गन लायसन्सचे दुकान पोलिसांनी सील केले असून त्या गन लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. तसेच या घटनेबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

धुळे जिल्ह्यात यापूर्वीही निष्काळजीपणामुळे किंवा वादातून गोळीबाराच्या काही घटना घडल्याच्या नोंदी पोलिसांकडे आहेत. काही वर्षांपूर्वी शस्त्र परवाना असलेल्या व्यक्तीकडून बंदूक हाताळताना चुकून गोळी सुटल्याने एका नागरिकाला दुखापत झाल्याची घटना समोर आली होती. काही प्रकरणांमध्ये वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याचीही उदाहरणे आढळली आहेत.

अशा घटनांनंतर पोलिस प्रशासनाकडून शस्त्रधारकांना सुरक्षित हाताळणीचे नियम पाळण्याचे आणि परवानाधारक शस्त्रांचा वापर अत्यंत जबाबदारीने करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शस्त्र परवाना धारकांची वेळोवेळी तपासणी आणि नियमांचे पालन होत आहे की नाही यावरही प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले जाते.