धुळे : उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक हालचाली, वाढती मालवाहतूक आणि नाशिक–जळगाव–धुळे या त्रिकोणातील संपर्कवृद्धीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळ विस्ताराचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. अर्थसंकल्प अधिवेशन २०२६ दरम्यान विधान भवन येथे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराची ठाम मागणी सभागृहात मांडली.

धुळे हे दोन राज्यांच्या सीमेवर वसलेले महत्त्वाचे शहर असून सात राष्ट्रीय महामार्गांनी जोडलेले दळणवळण केंद्र आहे. या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे जिल्ह्याचे व्यापारी व औद्योगिक महत्त्व सातत्याने वाढत आहे. संभाव्य लॉजिस्टिक्स पार्क, वाढती मालवाहतूक आणि औद्योगिक गुंतवणूक लक्षात घेता हवाई दळणवळण सक्षम करणे अत्यावश्यक असल्याने विमानतळ विस्ताराची गरज आहे. सध्याची धावपट्टी मर्यादित क्षमतेची असल्याने मोठ्या प्रवासी विमानांची किंवा मालवाहतूक सेवांची सुरुवात करणे शक्य नसल्याचे अनेकदा म्हटलेजाते, तथापि आ.अग्रवाल यांनी मात्र जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही बाब किती आवश्यक आहे हे अधोरेखित केले.

नियोजनातून निधीची आवश्यकता

नाशिक येथे येत्या ऑक्टोबरमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन होत आहे. यामुळे देश-विदेशातून भाविक कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी येतील. धुळे हे गुजरात व मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेवर वसलेले आहे. शिवाय, नाशिकपासून धुळे शहर अवघ्या १५० किलोमीटर अंतरावर असल्याने अनेक भाविक धुळेमार्गे नाशिककडे प्रस्थान करतील. सध्या धुळे शहरात गोंदूरलगत विमानतळ आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरालगत वाहनतळाची व्यवस्थाही करता येऊ शकेल. त्याबाबतही नियोजन समितीच्या माध्यमातून जागेची पूर्तता करण्यासह वाहळतळ व्यवस्थेसाठी कार्यवाही करण्याची गरज आहे.

धुळे येथील विमानतळावरील धावपट्टी विस्तार, टर्मिनल उभारणी आणि सुरक्षा यंत्रणा बळकट करण्यासाठी आ. अग्रवाल यांनी यावेळी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. नियोजनातून या कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. धुळे विमानतळाचा वापर मर्यादित स्वरूपात राहिला. काही वर्षांपूर्वी धावपट्टी दुरुस्ती व मूलभूत सुविधा उभारणीचे प्रयत्न झाले; तथापि अपेक्षित विस्ताराचा विषय पुढे सरकला नाही असे ते म्हणाले.

औद्योगिक विकास आणि नाशिक सिंहस्थमेळा

दरम्यान, औद्योगिक विस्तार आणि वाहतूक वाढीमुळे विमानतळ सक्षम करण्याची गरज अधिक प्रकर्षाने समोर आली आहे. नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थापनात धुळेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असेही अग्रवाल यांनी नमूद केले. पर्यायी हवाई सुविधा उपलब्ध झाल्यास प्रवासी आणि उद्योगक्षेत्राला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केवळ मागणी नोंदवण्यापुरते मर्यादित न राहता, महामार्ग जाळे, लॉजिस्टिक्स पार्क आणि प्रादेशिक विकास आराखड्याशी विमानतळाचा संबंध जोडत त्यांनी व्यापक विकासदृष्टी सभागृहासमोर मांडली.

धुळेकरांच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा सक्षम करण्याचा हा प्रयत्न असून, शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास विमानतळ विस्तार हा जिल्ह्याच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.