धुळे : येथील माजी आमदार अनिल गोटे यांच्या तक्रारीची दखल मुख्य निवडणूक आयोगाने घेतली असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना तात्काळ तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे दावा करण्यात आला आहे.

धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील तब्बल ४५ हजार बोगस मतदारांच्या नोंदणीच्या प्रकरणाने आता गांभीर्य प्राप्त केले आहे. शिवसेना नेते व माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर निवडणूक आयोगाने प्रतिसाद दिल्याने या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने गोटे यांच्या तक्रारीची दखल घेत लेखी पत्र पाठवले असून त्यानुसार जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी तातडीने तपासणी करून नियमोचित कार्यवाही करावी आणि अहवाल सादर करावा, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

गोटे यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत ०७-धुळे शहर विधानसभा मतदारसंघात ४५ हजार बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या तक्रारीत २७ हजार बोगस, १४ हजार मृत आणि शहर सोडून गेलेल्या मतदारांची नावे मतदार यादीत कायम असल्याचा उल्लेख आहे. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर फक्त तीन महिन्यांच्या कालावधीत २० हजार नवीन मतदारांची नोंदणी झाल्याचेही नमूद केले आहे.

तक्रारीत असे म्हटले आहे की धुळे शहरातील लिलाबाई चाळ, संभाप्पा कॉलनी, सुशील नगर, शास्वीनगर, नारायण मास्तर चाळ या भागात १३१९ हा एकच घर क्रमांक दाखवून १९५ कुटुंबांची नावे मतदार यादीत नोंदवली गेली आहेत. एका घरात एकाच नावाचे, एकाच जातीचे आणि समान लिंगाचे पाच-पाच मतदार नोंदवले गेले आहेत. अनेक ठिकाणी एकच पत्ता असून दोन ते सात वेगवेगळ्या मतदारांची नावे दाखवली आहेत. गोटे यांनी तक्रारीत (बी.एल.ओ.) अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, धुळे शहरात केवळ सातच गल्ल्या असताना मतदार यादीत ११, १३, ९९ असे क्रमांक देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ रासकर नगर पेठ १३ हा एक गल्ली क्रमांक खोपडे कॉलनी, स्टेशन रोड, अनमोल नगर आणि सर्वोदय कॉलनी या ठिकाणीही पेठ १३ म्हणूनच नोंदविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र धुळे शहरात ‘पेठ १३’ अस्तित्वातच नाही. यावरून बोगस मतदारांची नोंदणी ही जाणूनबुजून केल्याचे स्पष्ट होते. यामुळे या बोगस मतदारांच्या बनावट पत्त्यांवर मतदान केंद्रांच्या स्लीपा कशा पोहोचवल्या गेल्या? त्या कोणत्या पत्त्यावर दिल्या गेल्या याचा खुलासा होणे आवश्यक आहे असे या तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात अधिक तपास केला असता २७ हजार मतदार मूळ यादीत असून त्यांच्या पत्त्यांमध्ये फेरफार करण्यात आले आहेत. ही निष्पक्ष निवडणूक यंत्रणेची लक्षणे नव्हेत. निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी यांनी भ्रष्टाचाराला खतपाणी घातले आहे, म्हणजेच कुंपणानेच शेत खाल्ले आहे. या प्रकरणाची दखल मुख्य निवडणूक आयोगाने घेतल्याचे या पत्रकात म्हटले असून आता जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यावर चौकशीची जबाबदारी आली आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चौकशीचा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. धुळेकर नागरिकांसह सर्वच राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष या चौकशीकडे लागले आहे. असे माजी आमदार अनिल गोटे यांच्यातर्फे त्यांचे स्वीय सहाय्यक तुषार मराठे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीतील (२०२४) मतदार यादीची छाननी केल्यावर तब्बल ४५ हजार मतदारांची नावे बेकायदेशीर मार्गाने समाविष्ट करण्यात आली असून ११ हजार मतदारांनी मृत्यू पश्चात मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अशी माहिती शिवसेनेचे (उबाठा) ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी याआधी दिली होती यासंदर्भातही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले होते.