धुळे : साक्री तालुक्यातील आदर्श गाव बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा येथील वन धन केंद्रांनी तयार केलेल्या मोहापासूनच्या विविध वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. निसर्गसंपन्न परिसरातील स्थानिक महिलांच्या मदतीने तयार केलेल्या या उत्पादनांमुळे गावातील हातांना आर्थिक बळकटी मिळणार असून स्थानिक उद्योजकतेला नवी दिशा मिळू शकते.
नवी दिल्ली येथे १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या एकदिवसीय आदिवासी व्यवसाय परिषदेत मोह फुलांपासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले. या परिषदेत देशभरातील व्यावसायिक, सरकारी अधिकारी आणि आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. वन धन केंद्राने मोहा मनुका, मोहा तेल, मोहा चॉकलेट, साबण आणि बॉडी स्क्रीम यांसारखी स्थानिक उत्पादने विशेष आकर्षण ठरली.
परिषदेला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी या उत्पादनांची प्रयोगशाळेमध्ये चाचणी करून गुणवत्ता सिद्ध झाल्यास कच्चा माल खरेदी करण्याचे आश्वासन दिले. विशेषतः मोहा तेलाची चाचणी समाधानकारक ठरल्यास ते कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी संस्थांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे संकेत मिळाले आहेत. या निर्णयामुळे स्थानिक स्तरावरील उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
वन धन केंद्राचे सचिव उमेश देशमुख यांनी सांगितले की, परिषदेला देश-विदेशातील आदिवासी समाजातून मोठा सहभाग होता. स्वनिर्मित वस्तूंना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून उत्पादकांना मोठे प्रोत्साहन लाभले. मोह फुल आणि फळांपासून तयार होणाऱ्या उत्पादनांची विविधता आणि गुणवत्ता पाहून अनेक व्यावसायिकांनी विशेष उत्सुकता दर्शवली. वन धन केंद्राचे सदस्य राजेश महाले यांनी सांगितले की, मोह झाडापासून मिळणाऱ्या फुलांपासून ते फळांपर्यंत सर्व घटकांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तूंना देशांतर्गत तसेच परदेशात मोठी मागणी निर्माण होऊ शकते. यामुळे स्थानिक आदिवासी समाजाचे उत्पन्न वाढण्याबरोबरच स्वयंपूर्णतेच्या दिशेने गावांची वाटचाल अधिक वेगवान होणार आहे.
या स्टॉलला गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तळेकर, राज्यमंत्री दुर्गादास विखे, वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुवाल ओराम यांनी भेट देऊन उत्पादकांचे मनापासून कौतुक केले. या परिषदेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील वन धन उत्पादनांना देश-विदेशातील मोठ्या व्यावसायिक दृष्टीकोनाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
बारीपाडा भागाचा उल्लेख झाला की पद्मश्री चैत्राम पवार यांचे नाव स्वाभाविकच पुढे येते. बारीपाडा गावाने जलसंवर्धन, सामाजिक समन्वय, लोकसहभागातून विकास, नशाबंधी आणि स्वच्छतेसारख्या अनेक उपक्रमांचे यशस्वी मॉडेल उभे केले आहे. या उपक्रमांमुळे संपूर्ण नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात ग्रामीण भागात विकासाच्या नवचळवळीला गती मिळाली. गावातील प्रत्येक कामात युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असल्याने हा बदल समाजाच्या तळागाळातून उभा राहिल्याचे दिसते.
पद्मश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांत बारीपाडा समूहात पर्यावरण संरक्षण, जलव्यवस्थापन, परंपरागत शेती, स्थानिक उद्योजकता आणि सामुदायिक नेतृत्व विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वन धन केंद्राच्या उत्पादनांना मिळणारा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिसाद हा स्थानिक विकासमॉडेलसाठी मोठा टप्पा मानला जात आहे. ग्रामीण जीवनातील संसाधने योग्य प्रकारे वापरल्यास त्यातून मोठ्या आर्थिक संधी निर्माण होऊ शकतात, याची जिवंत उदाहरणे बारीपाडा आणि परिसरातील गावांनी सिद्ध केली आहेत.
