धुळे: शिंदखेडा तालुक्यातील माळीच (कलमाडी) परिसरातील भूसंपादन प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला निवेदन दिले. योग्य मोबदला व न्याय्य तोडगा निघाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याचा ठाम इशारा आज (दि. ३०) संतप्त शेतकऱ्यांनी दिला.
बोरविहीर – नरडाणा रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने महसूल, रेल्वे आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी आज (दि. ३०) सकाळी माळीच – कलमाडी (ता. शिंदखेडा) येथे आले होते. यावेळी शेतकरी व अधिकारी यांच्यात भुसंपादन प्रक्रियेवर चर्चा झाली. यासंदर्भात ऐनवेळी झालेल्या चर्चा वजा बैठकीत तहसीलदार निलीनकुमार देवरे, मंडळ अधिकारी स्वाती वाघ, रेल्वेचे अधिकारी समीर कुमार यांच्यासह पोलिस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी भूसंपादन प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व अडचणी प्रशासनासमोर मांडल्या.
प्रशासनाकडून दबाव, शेतकऱ्यांना नेले पोलीस ठाण्यात
यासंदर्भात शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून भूसंपादनासाठी दबाव टाकला जात असून काही शेतकऱ्यांना पोलिस बंदोबस्तात सोनगीर पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. “रेल्वे मार्गाला आमचा विरोध नाही, रेल्वे मार्ग झालाच पाहिजे पण आमच्या जमिनीला बाजारभावानुसार मोबदला मिळायला हवा याशिवाय आम्ही आमची जमीन देणार नाही,” अशी भूमिका शेतकऱ्यांनी स्पष्ट केली.
प्रशासनाने लवकरात लवकर न्याय्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
ठोस निर्णय नसल्याचा आरोप
दरम्यान, भूसंपादन प्रक्रियेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची उपजीविका पूर्णपणे शेतीवर अवलंबून असून जमीन गेल्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता शेतकऱ्यांशी संवाद साधून विश्वासात घ्यावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यावेळी काही शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या बदल्यात पर्यायी जमीन, पुनर्वसन तसेच बाजारभावापेक्षा वाढीव मोबदला देण्याची मागणीही केली.
प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे अनेकदा अनेकांकडून सांगण्यात आले. मात्र, ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत भूसंपादनास विरोध कायम राहील, अशी भूमिका शेतकऱ्यांनी पुन्हा स्पष्ट केली. यावेळी नानाभाऊ देसले, शिवाजी देसले, अशोक बोढरे, दीपक देसले,लालचंद देसले, विश्वास देसले आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.
