धुळे: पाच हजार रुपये द्या, अन्यथा बिल प्रक्रिया पुढे जाऊ देणार नसल्याचे सांगून शेतकऱ्याकडून पाच हजाराची लाच स्वीकारताच पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि.३) रंगेहात पकडले.

मनिष महेश बागुल (३०) असे लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापकाचे नाव असून तो धुळे तहसील कार्यालयाचा कर्मचारी आहे. बागुल याच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धुळे तालुक्यातील अंचाडे येथील रहिवासी असून त्यांनी व त्यांच्या पत्नीने शेतात पिकविलेली ज्वारी महाराष्ट्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानुसार ज्वारीचा माल धुळे येथील शासकीय गोदामात खरेदीसाठी आणण्यात आला होता.

यावेळी मालाची मोजणी करून तक्रारदारांना पावत्या देण्यात आल्या. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक मनिष बागुल यांनी तक्रारदारांना बाजूला बोलावून त्यांच्या ज्वारीचा दर्जा चांगला दाखवून मोजणी करून घेण्यासाठी तसेच ऑनलाइन बिल प्रक्रियेस अडथळा येऊ नये यासाठी पाच  हजार रुपयांची मागणी केली. अन्यथा बिल प्रक्रिया पुढे जाऊ देणार नसल्याचे सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.

या मागणीबाबत तक्रारदारांनी त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी मनिष बागुल यांनी पंचांसमक्ष पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान मनिष बागुल यांनी तक्रारदाराकडून पाच  हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. कारवाईनंतर त्यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैदाणे, सागर माळी आणि सुधीर मोरे यांचा सहभाग होता.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन

दरम्यान, शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तींकडून कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे. विभागाचा टोलफ्री क्रमांक १०६४ असून धुळे कार्यालयाचा व्हॉट्सअॅप क्रमांक ७७९८१६१०६४ आहे.