जळगाव : चाळीसगाव ते धुळे दरम्यान धावणारी मेमू रेल्वे गाडी आठवड्याचे सर्व दिवस नियमित सुरू ठेवावी तसेच या मार्गावरील भोरस, बोरविहीर आणि मोहाडी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत तातडीने पत्र्याचे शेड उभारण्यात यावेत, अशी मागणी रयत सेनेच्या वतीने भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत शर्मा यांच्याकडे करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
चाळीसगाव–धुळे मार्गावरील मेमू रेल्वे गाडी जळगावसह धुळे जिल्ह्यातील हजारो प्रवाशांसाठी दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. दररोज चार फेऱ्या करणाऱ्या या गाडीमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना स्वस्त, सुरक्षित आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध होत आहे. विशेषतः चाळीसगाव, भोरस, बोरविहीर, मोहाडी आणि धुळे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर या गाडीचा वापर करत असल्याने या मार्गावरील प्रवासी वाहतुकीसाठी मेमू सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून गाडीच्या नियमित देखभालीचे कारण देत दर रविवारी ही सेवा बंद ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मेमू गाडीच्या तांत्रिक देखभालीचे काम दर १५ दिवसांनी होत असताना प्रत्येक रविवारी सेवा बंद ठेवण्यामागचे कारण स्पष्ट करण्याची मागणी रयत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
आठवड्यातून एक दिवस नियमितपणे रविवारी गाडी बंद राहत असल्यामुळे कामानिमित्त बाहेर जाणारे नागरिक, स्पर्धा परीक्षा व शिक्षणासाठी प्रवास करणारे विद्यार्थी, लहान व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रविवारी रेल्वे सेवा बंद असल्याने अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी जादा भाडे मोजावे लागत आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांवर याचा अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही वेळा प्रवाशांना वेळेवर पर्यायी वाहतूक उपलब्ध होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक कामकाजही प्रभावित होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याशिवाय भोरस, बोरविहीर आणि मोहाडी रेल्वे स्थानकांवरील मूलभूत सुविधांचा अभाव हा देखील गंभीर प्रश्न असल्याचे रयत सेनेने निदर्शनास आणून दिले आहे.
भोरस, बोरविहीर आणि मोहाडी स्थानकांवर प्रवाशांना बसण्यासाठी किंवा उभे राहण्यासाठी पुरेशी सुविधा नसल्याने उन्हाळ्यात कडक उन्हाचा तसेच पावसाळ्यात मुसळधार पावसाचा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना याचा मोठा फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने या दोन्ही स्थानकांवर तातडीने पत्र्याचे शेड उभारून प्रवाशांसाठी आवश्यक संरक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वच्छ पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि प्रकाश योजना यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही संघटनेने केली आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा रयत सेनेचे प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका अध्यक्ष प्रदीप मराठे आदींनी दिला आहे.
