धुळे : व्यवसायिकाला जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओच्या आधारे वीस लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच बलात्काराची खोटी तक्रार देण्याची धमकी देत ही खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
माहितीनुसार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे दोन वाजता एका तरुणीने संबंधित व्यवसायिकाशी नोकरीबाबत चर्चा करायची असल्याचे सांगून त्यांना देवपूर येथील एका कॉलनीतील घरात बोलावले. घरात बसल्यानंतर तरुणीने अचानक मागून मिठी मारत त्यांचा शर्ट काढला. त्याचवेळी तिच्या टोळीतील नरेश कांतीलाल गवळी, रा. नरडाणा चौफुली, देवपूर धुळे, रविंद्र अशोक डोंगरे, रा. रमाबाई आंबेडकर नगर, देवपूर धुळे तसेच इतर दोन महिला व तीन पुरुष यांनी त्या प्रसंगाचा व्हिडिओ चित्रीत केला.
यानंतर संबंधित व्हिडिओ व्यवसायिकाच्या मित्रपरिवार व नातेवाईकांना पाठविण्याची तसेच बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देत वीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. विरोध केल्यावर व्यवसायिकाला मारहाण करण्यात आल्याचेही समोर आले आहे. घटनेनंतर व्यवसायिकाने स्थानिक गुन्हे शाखेकडे धाव घेत तक्रार नोंदवली. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील महिला अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. देवपूर परिसरात दोन दुचाकींवर उभ्या असलेल्या संशयितांकडे फिर्यादीने ओळख पटवून दिल्यानंतर पोलिसांनी नरेश गवळी, रविंद्र डोंगरे आणि संबंधित तरुणी यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर फरार संशयितांचा शोध सुरू असून टोळीचे जाळे उलगडण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
गवळी हाच मुख्यसूत्रधार
मुख्य आरोपी नरेश गवळी याची एक संघटित टोळी असून, तरुणींमार्फत पुरुषांना जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ तयार करणे आणि तो व्हायरल करण्याची तसेच बलात्काराची खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी उकळणे हा त्यांचा पद्धतशीर व्यवसाय असल्याचा पोलिसांचा संशय आहे. गवळी याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून तो कठोर कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात दहा महिने स्थानबद्ध होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
भीतीचे वातावरण
या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून व्यावसायिक व व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याची भीती दाखवून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढत असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत अनोळखी व्यक्तींशी एकांत ठिकाणी भेटणे टाळावे, तसेच कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिना तडवी, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे तसेच पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास सुरू असून नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

