धुळे: जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ६१ हजार ४७४ रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जय शंकर मार्केट मधील श्री. साई ट्रेडर्सचा संचालक कैलास देवानंद नानकाणी (५०, रा.प्लॉट नं.३, अरुणकुमार वैद्यनगर, विद्या अपार्टमेन्ट, धुळे) व सार्वजनिक मार्केट येथील बिग बाजार मधील फजलू रहेमान मोहम्मद सलीम अन्सारी (३२, रा. सार्वजनिक मार्केट जवळ, पाकीजा कलेक्शन शेजारी, धुळे) अशी संशयितांची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीची गुप्त पद्धतीने खात्री करण्यात आली आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करून तीन एप्रिल २०२६ रोजी धुळे शहरात छापेमारी करण्यात आली. यावेळी जय शंकर मार्केट येथील श्री. साई ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकण्यात आला. येथे गोरी ब्युटी क्रीम, गोरी व्हायटनिंग साबण व चांदणी व्हायटनिंग क्रीम अशी विविध सौंदर्यप्रसाधने मिळून ३० हजार ६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर नॅशनल हायस्कूलच्या मागील सार्वजनिक मार्केटमधील बिग बाजार या दुकानावरही छापा टाकण्यात आला. येथे गोरी ब्युटी क्रीम, फैजा ब्युटी क्रीम, गोल्डन पर्ल क्रीम, डबल व्हाईट प्लस व्हिटॅमिन सी, फेस फ्रेश गोल्ड यांसारखी विविध उत्पादने मिळून ३१ हजार ४११ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या दोन्ही ठिकाणी मिळालेली सर्व उत्पादने पाकिस्तान निर्मित असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या वस्तू संदर्भात अधिक चौकशी केली असता पोलिसांना संबंधित दुकानदारांकडे कोणत्याही प्रकारचे अधिकृत बिल किंवा परवाने आढळले नाहीत. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार पाकिस्तानातून आयात करण्यात आलेल्या वस्तूंवर बंदी असताना देखील या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. तसेच ही सौंदर्यप्रसाधने मानवी आरोग्यास अपायकारक असण्याची शक्यता असल्यानेही ही कारवाई करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाणे आणि धुळे शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून, संशयितांविरुद्ध विदेशी व्यापार (विकास व विनियमन) अधिनियम १९९२, भारतीय न्याय संहिता तसेच औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने केली. नागरिकांनी परवाना नसलेली किंवा संशयास्पद सौंदर्यप्रसाधने खरेदी करू नयेत व अशा प्रकारच्या बेकायदेशीर विक्रीबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.