धुळे : राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी धुळे तालुक्यातील अजनाळे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला अचानक भेट देत शैक्षणिक व्यवस्थेची पाहणी केली. या पाहणीत ४० पटसंख्या असलेल्या शाळेत अवघे सात विद्यार्थी उपस्थित असल्याचे आढळले. उपस्थित सात विद्यार्थ्यांपैकी केवळ चार विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान केला होता. तसेच मुख्याध्यापक किशोर धनजी परदेशी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले.

मालेगावहून धुळ्याकडे येत असताना कुसुंबा मार्गे अजनाळे येथील पाअर्धी वस्तीवरील जिल्हा परिषद मराठी शाळेला शिक्षणमंत्र्यांनी सकाळी सुमारे ११ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान अचानक भेट दिली. शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती असताना त्यापैकी एक शिक्षक अनुपस्थित होता, तर दुसरे शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले.

शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे गणवेश, शाळेची स्थिती आणि एकूण शैक्षणिक व्यवस्थेची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या गणवेशाची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी वैभव बागल, धुळे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, कुसुंबा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी तसेच संबंधित केंद्रप्रमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय, जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पुढील १५ दिवसांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेशही शिक्षणमंत्र्यांनी दिले. दिवाळीपूर्वी घरांची जशी स्वच्छता केली जाते, त्याच धर्तीवर प्रत्येक शाळेची संपूर्ण साफसफाई करून परिसर सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. १५ दिवसांनंतर पुन्हा प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. त्यावेळीही अशाच प्रकारच्या त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांसह संपूर्ण विभागाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

यावेळी शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबरोबरच शिक्षकांची वेळेवर उपस्थिती, शाळेतील अध्यापनाची गुणवत्ता, शालेय परिसराची स्वच्छता आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांचीही माहिती घेतली. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे आणि शाळांमधील शिस्त, स्वच्छता व गुणवत्ता याबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

शिक्षणमंत्र्यांच्या या आकस्मिक भेटीनंतर जिल्ह्यातील शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून, इतर जिल्हा परिषद शाळांमध्येही उपस्थिती, स्वच्छता, गणवेश, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय कामकाजाची तातडीने पडताळणी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत जिल्हाभरातील शाळांची तपासणी मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, नियमांचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.