धुळे : धुळे जिल्हा सत्र न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीवजा ई-मेल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाल्याने सोमवारी पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. ई-मेल प्राप्त होताच जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने संबंधित विभागांना सूचना देऊन न्यायालय परिसरात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले.
जिल्हा सत्र न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर तातडीने पोलीस बंदोबस्त पाठविण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या असून, धुळे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीतील सर्व व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), श्वान पथक तसेच स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ न्यायालय परिसरात धाव घेतली. न्यायालयाच्या इमारतीतील विविध विभाग, प्रवेशद्वार, वाहनतळ, परिसरातील संवेदनशील ठिकाणे तसेच संशयास्पद वस्तूंची बारकाईने तपासणी करण्यात आली.
सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ई-मेलमध्ये करण्यात आलेल्या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. हा ई-मेल कोठून पाठविण्यात आला, तो पाठविणाऱ्या व्यक्तीचा उद्देश काय होता, याचा शोध घेण्यासाठी सायबर पथकाच्या माध्यमातून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. ई-मेलमधील तांत्रिक माहिती, पाठविण्याचे ठिकाण आणि संबंधित बाबींची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, घटनेनंतर न्यायालय परिसरात दुपारी तीन वाजेनंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने उपाययोजना करत परिस्थिती नियंत्रणात आणली. न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिक, पक्षकार, वकील तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या. पोलीस प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. संशयास्पद वस्तू, व्यक्ती किंवा हालचाल आढळून आल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. धुळे जिल्हा न्यायालय हे महत्त्वाचे शासकीय ठिकाण असल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. धमकीवजा ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून तांत्रिक आणि गोपनीय तपासाला वेग देण्यात आला आहे.
दरम्यान, न्यायालयासारख्या संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारचा धमकीवजा ई-मेल प्राप्त झाल्याने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. न्यायालय परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी, प्रवेशद्वारांवरील बंदोबस्त आणि सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत असून, संबंधित यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
