धुळे : जिल्ह्यात गेल्या दोनच दिवसांत पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत बनावट चलन, गावठी कट्टा, अनैतिक देहविक्री आणि अंमली पदार्थ असा एकूण चार मोठ्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारीवर काहीसा अंकुश बसला असून, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हे सर्व ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पाडले.

राष्ट्रीय महामार्गावरील चांदे (ता. धुळे) येथील सूर्यपुत्र हॉटेलवर धुळे तालुका पोलिसांनी छापा टाकून बुलढाणा येथील मोहम्मद जफर मोहम्मद कुद्दुस (वय ३०) या व्यक्तीकडून भारतीय चलनाच्या बनावट नोटा जप्त केल्या. पोलिसांनी त्याच्याकडून ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांमध्ये एकूण २२ हजार रुपयांची नकली रक्कम हस्तगत केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, शिरपूर तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांनी गावठी कट्ट्यासह दोन तरुणांना पकडले. प्रकाश लक्ष्मण राठोड (२३) आणि साहिल युनुस शेख (२०) दोघेही पुणे येथील असून, त्यांच्या ताब्यातून २५ हजार रुपयांचा गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि ५० हजार रुपयांची मोटरसायकल असा ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले.

शहरातील देवपूर परिसरात पश्चिम देवपूर पोलिसांनी अनैतिक देहविक्री व्यवसाय करणाऱ्या टोळीवर छापा टाकून एकाला अटक केली असून, ठाणे आणि मुंबई येथील दोन महिलांची सुटका करण्यात आली. घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्य, तीन मोबाईल हँडसेट आणि पाच हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली. मुख्य संशयित तेजस जैन फरार असून, राहुल पाटील या तरुणाला अटक करण्यात आली आहे. याशिवाय, शिरपूर शहर पोलिसांनी सामरपाडा शिवारातील वनक्षेत्रात ६०० किलो वजनाचा हिरवागार गांजासदृश्य अंमली पदार्थ जप्त केला असून त्याची किंमत अंदाजे १२ लाख रुपये आहे. संशयित जितू शिकाऱ्या पावरा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

धुळे जिल्ह्यातील विशेषतः शिरपूर तालुक्यामध्ये बनावट दारूचे कारखाने आणि शेकडो एकर वन जमिनीवर गांजाची शेती केली जात असल्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षापासून उघडकीस येत आहेत यामुळे वनविभाग आणि पोलिस विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून गांजा शेती उद्ध्वस्त करण्याच्या कार्यवाहीला गती दिली आहे. यात भरीसभर म्हणून बेकायदेशीर आणि प्रतिबंधित असलेल्या सुगंधी तंबाखू,गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री खुलेआमपणे चालू असल्याच्या घटना अनेक वेळा उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी यापूर्वीही अशा ठिकाणी कारवाया करून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे परंतु तरीही गुन्हेगार सातत्याने असे कृत्य करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोनच दिवसात केलेल्या या सलग चार मोठ्या कारवायांमुळे धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगताला मोठा धक्का बसला आहे. पोलीस दलाकडून मिळालेल्या वेगवान कारवाई आणि समन्वयामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.