धुळे : राज्याचे पणन, राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा निवडणुकीतील दावा शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीने अखेर फोल ठरविला. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) कलावती माळी या विजयी झाल्याअसून भाजपाच्या रजनी वानखेडे यांचा पराभव झाला आहे.
आज सकाळी दहा वाजेपासून सुरु झालेल्या मतमोजणी नंतर साऱ्यांचेच डोळे निकालकडे लागून आहेत. जिल्ह्यातील दोंडाईचा (नगराध्यक्ष पदासह सर्व जागा बिनविरोध) निवडणूकी नंतर उरलेल्या शिंदखेडा, शिरपूर आणि पिंपळनेर येथील स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्षपदासह सदस्य निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
नगरपरिषद अस्तित्वात आल्यावर पिंपळनेर येथे झालेल्या पहिल्याच निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा मान मतदारांनी भाजपाला दिला आहे.या ठिकाणी भाजपाच्या डॉ. योगिता जितेश चौरे या विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाच्या ललिता प्रेमानंद गायकवाड या पराभूत झाल्या. दुसरीकडे शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) कलावती सुकलाल माळी यांनी विजय संपादन केला तर भाजपाच्या रजनी अनिल वानखेडे यांचा पराभव झाला. या दोन निकालातून पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केलेला “चारही ठिकाणी शतप्रतिशत भाजपा आणि नगराध्यक्षही भाजपाचाच असेल” हा दावा फोल ठरला आहे. शिंदखेड्यात मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) साथ देत नगरपंचायतीवर कलावती माळी यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले आहे.
शिरपूर येथे भाजपाचे चिंतन पटेल यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) हेमंत पाटील यांच्यापेक्षा अधिक मते घेत मतमोजणी सुरु असलेल्या जवळपास सर्वच ठिकाणी आघाडी घेतली आहे.
